स्थायी समितीच्या बजेटची अंमलबजावणी नाही : फक्त ६३.७५ कोटीची तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी लोकोपयोगी कामे, सिमेंट रोड, रस्ते दुरुस्ती व आवश्यक कामासाठी १२७.५२ कोटीची तरतूद केली होती. परंतु यात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५० टक्के कपात करून ६३.७५ कोटीची सुधरित तरतूद केली आहे. विशेष म्हणजे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही निधीत कपात करून सत्ताधाऱ्यांना झटका दिला आहे.
वास्तविक अर्थसंकल्पात इतर विकास कामासाठी तरतूद असूनही मंजुरी दिलेली नाही. विद्यामान स्थायी समिती अध्यक्षांचा कालावधी फक्त दीड महिना शिल्लक आहे. वर्षभरापासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २,७३१ कोटीचा अर्थसंकल्प ऑक्टोबर महिन्यात दिला होता. आता हा अर्थसंकल्प कागदावरच राहणार आहे. विशेष म्हणजे झलके यांनी ४६६.६ कोटीने बजेट कमी दिले होते. असे असूनही मनपाची बिकट आर्थिक स्थिती, उद्दिष्ट प्राप्त न करणे व नवीन आर्थिक स्रोत निर्माण न केल्याने अर्थसंकल्प अद्याप अंमलात आलेला नाही. २० ऑक्टोबरला अथंसंकल्प सादर केल्यानतंर दोन आठवड्याने प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. ती ५ डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतरही आयुक्तांनी अर्थसंकल्प अंमलात आणला नाही. प्रभागातील रस्ते, गडरलाईन, अर्धवट कामे सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी आग्रह सुरू केला. यासाठी दबाव निर्माण केला. याचा विचार करता मनपा आयुक्तांनी पाच शीर्षकात ५० टक्के कपात करून नवीन आदेश लागू केला. यामुळे प्रभागात काही प्रमाणात कामे सुरू होतील. विशेष म्हणजे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या वैयक्तिक निधीला ५० टक्के कट लावला आहे.
....
स्थायी समिती अध्यक्ष नाराज
अर्थसंकल्पाला कात्री लावल्याने स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके नाराज दिसले. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावर अद्याप अंमल सुरू झालेला नाही. पाच शीर्षकातील तरतुदीला ५० टक्के कट लावला आहे. यामुळे विकास कामे होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आयुक्तांनी काही तरतूद करून वर्षभरापासुन थांबलेली कामे सुरू होतील. पुढे विकास कामासाठी तरतूद केली जाईल.
.....
१७०० कोटी उत्पन्नाचा अंदाज
आयुक्तांच्या परिपत्रकानुसार कोविडमुळे मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तसेच मनपावर विविध प्रकारची २३९४.६९ कोटींची देणी आहे. दुसरीकडे एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान मनपा तिजोरीत १३९३.२४ कोटीचा महसूल जमा झाला. वित्त वर्षात मनपा तिजोरीत १७०० कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. शहरात विकास कामे होणे गरजेचे आहे. यामुळे पाच शीर्षकात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक आयुक्तांनी काही दिवसापूर्वी मनपाकडे ७०० कोटी देणी असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले होते.
....................
या शीर्षकात झाली ५० टक्के कपात
शीर्षक अर्थसंकल्पात तरतूद नवीन तरतूद (कोटी)
वॉर्डातील विकास कामे ४५.५७ २२.७८
पं. दीनदयाल उपाध्याय ४२.२८ २१.१४
शहर विकास ८.४४ ४.२२
अन्य विकास कामे १३.९२. ६.९६
रस्ते दुरुस्ती व निर्माण १७.३१ ८.६५.