कर्मचाऱ्यांच्या दुष्काळात मंजूर पदांना कात्री

By Admin | Updated: August 21, 2016 03:13 IST2016-08-21T03:13:38+5:302016-08-21T03:13:38+5:30

नागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही.

Scissors to the designated posts in the employees' drought | कर्मचाऱ्यांच्या दुष्काळात मंजूर पदांना कात्री

कर्मचाऱ्यांच्या दुष्काळात मंजूर पदांना कात्री

आरटीओत कामाचा वाढला ताण :
सहायक मोटार वाहन निरीक्षकाची ५८ पदे केली कमी
सुमेध वाघमारे नागपूर
नागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही. परिणामी, कामाची गती मंदावते. याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसतो. सद्यस्थितीत नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अशा विचित्र कात्रीत सापडले आहे. तब्बल ४४ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, परिवहन विभागाने नागपूर विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ६६ पदे वाढविण्याचा निर्णय घेतला असताना अचानक ५८ पदे कमी केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर विभागाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) नागपूर ग्रामीणसह, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा ही पाच आरटीओ कार्यालये येतात. नागपूर विभागात दिवसाला सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद एकट्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते. वर्षभरात साधारण १० लाख वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे आरटीओच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. याचा प्रभाव रोजच्या कामकाजावर पडला असून याचा फायदा दलाल घेत असल्याचे चित्र आहे.

नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४६ पदे रिक्त
सर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात ४६ पदे रिक्त आहेत. कार्यालयात ११९ पदे मंजूर असताना केवळ ७३ पदे भरण्यात आली आहेत. विशेषत: सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तीन पदे, मोटार वाहन निरीक्षकाचे सात तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची १० पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाने या कार्यालयासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १० वाढीव पदांना मंजुरी दिली होती, परंतु महिना होत नाही तोच नऊ पदे कमी केली. परिणामी, कामाचा ताण वाढला असून प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Scissors to the designated posts in the employees' drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.