वैज्ञानिक महिलेला तीन लाखांचा गंडा
By Admin | Updated: July 6, 2015 03:03 IST2015-07-06T03:03:24+5:302015-07-06T03:03:24+5:30
लग्नाच्या नावाखाली आॅनलाईन जवळीक साधून लंडनमधील एका कथित डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांनी येथील एका सहायक वैज्ञानिक (असि. सायंटिस्ट) महिलेला तीन लाखांचा गंडा घातला.

वैज्ञानिक महिलेला तीन लाखांचा गंडा
नागपूर : लग्नाच्या नावाखाली आॅनलाईन जवळीक साधून लंडनमधील एका कथित डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांनी येथील एका सहायक वैज्ञानिक (असि. सायंटिस्ट) महिलेला तीन लाखांचा गंडा घातला. आरोपींची बनवाबनवी वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांचे २७ लाख बचावले.
प्रतिभा शामसुंदर चंदेल (वय ३९) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या सीएमपीडीआयमध्ये सहायक वैज्ञानिक आहेत. गिट्टीखदानमधील कस्तुरबानगरात राहाणाऱ्या प्रतिभा चंदेल यांनी काही दिवसांपूर्वी लग्न करण्याकरिता ‘सेकंड शादी डॉट कॉम‘ वेबस्थळावर स्वत:बाबतची माहिती नोंदवली होती.
स्वत:चे नाव डॉ. मोहन सिंग सांगून आपण लंडनमध्ये राहतो, असे सांगणाऱ्या आरोपीने प्रतिभा यांच्याशी आॅनलाईन सलगी साधली. संपर्कानंतर त्याने प्रतिभा यांना लग्नाची ‘रिक्वेस्ट‘ पाठविली. मी लंडनमध्ये डॉक्टर आहो. मात्र, आता लग्न करून नागपूरलाच वैद्यकीय व्यवसाय सुरू करायचा आहे, असेही सांगितले. अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर २९ जूनला डॉ. मोहन सिंगने आपण साडेआठ लाख डॉलर घेऊन लंडनमधून भारतात यायला निघाल्याचे प्रतिभा यांना कळविले. त्यानंतर ३० जूनला सकाळी १० वाजता त्याने प्रतिभा यांच्याशी संपर्क करून ‘आपल्याला ८ लाख, ५० हजार डॉलरसह कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर पकडल्याचे सांगितले‘. येथे दंडाची रक्कम म्हणून ७८ हजार रुपये तातडीने भरायचे आहे, असे सांगून प्रतिभा यांना रक्कम मागितली. त्यानुसार प्रतिभा यांनी डॉ. मोहनने सांगितलेल्या खात्यात ७८ हजार जमा केले.
त्यानंतर आरोपी मोहनसिंगचे नातेवाईक अर्चना सिंग आणि निकोलस या दोघांनी वेळोवेळी संपर्क करून प्रतिभा यांना वेगवेगळे कारण सांगत ३ लाख ९ हजार रुपये भरण्यास सांगितले. प्रतिभा यांनी ती रक्कमही संबंधित खात्यात जमा केली.(प्रतिनिधी)