१३ एप्रिलला सायन्स एक्स्प्रेस नागपुरात
By Admin | Updated: April 8, 2016 03:10 IST2016-04-08T03:10:49+5:302016-04-08T03:10:49+5:30
सायन्स एक्स्प्रेस क्लायमेट अॅक्शन स्पेशल ट्रेन भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे.

१३ एप्रिलला सायन्स एक्स्प्रेस नागपुरात
होम प्लॅटफार्मवर थांबणार : हवामानातील बदलावर प्रदर्शन
नागपूर : सायन्स एक्स्प्रेस क्लायमेट अॅक्शन स्पेशल ट्रेन भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. हवामान बदल या विषयावर नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने १६ बोगीमध्ये जलवायूविषयी सर्वंकष माहिती असलेली ट्रेन नागपूरमध्ये दिनांक १३ एप्रिल रोजी येत आहे. या रेल्वेगाडीचा शुभारंभ १५ आॅक्टोबर २०१५ रोजी सफदरजंग रेल्वे स्टेशन नवी दिल्लीवरून झाला होता. ७ महिन्यात १९,८०० किलोमिटरचा प्रवास करुन २० राज्यातील ६४ स्टेशनवर थांबल्यानंतर ही एक्स्प्रेस आता नागपुरातील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मवर येणार आहे.
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वतयारीविषयी आढावा बैठक आज झाली. बैठकीत मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’, जैव वैविधतेचे प्रमुख, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, एनएसएस विभागप्रमुख तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या उपस्थितीत सायन्स एक्स्प्रेसचे स्वागत आणि प्रदर्शनीचे उद्घाटन १३ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मवर होणार आहे. प्रदर्शनीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ एप्रिलला दुपारी ३ वाजता होणार आहे. वातावरण बदल, प्रादेशिक व जागतिक पातळीवर होणारे हवामानातील बदल, कारणे व त्याचे परिणाम, पर्यावरण संतुलित कार्यक्रम, कृषी व जनजीवनावर होणारे परिणाम त्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत एकूण १६ बोगीमध्ये सायन्स प्रदर्शनी राहणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)