विज्ञानाधिष्ठित समाजच स्वतंत्र असतो

By Admin | Updated: May 31, 2015 02:48 IST2015-05-31T02:48:20+5:302015-05-31T02:48:20+5:30

भारतीय संस्कृतीने नेहमीच विज्ञानाला महत्व दिले आहे. समाज विज्ञानाधिष्ठीत असला तरच तो स्वतंत्र असतो आणि समृद्ध होतो.

The science-based society is very independent | विज्ञानाधिष्ठित समाजच स्वतंत्र असतो

विज्ञानाधिष्ठित समाजच स्वतंत्र असतो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : प्रो. राजेन्द्रसिंग सायन्स एक्सप्लोरेटरीचे उद्घाटन
नागपूर : भारतीय संस्कृतीने नेहमीच विज्ञानाला महत्व दिले आहे. समाज विज्ञानाधिष्ठीत असला तरच तो स्वतंत्र असतो आणि समृद्ध होतो. त्यामुळेच विज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी विज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
युवा झेप प्रतिष्ठान आणि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्यावतीने प्रो. राजेन्द्रसिंग सायन्स एक्सप्लोरेटरीचे उद्घाटन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह सुरेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला एमकेसीएलचे सीईओ विवेक सावंत, ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनचे अध्यक्ष निखिल मुंडले, एक्सप्लोरेटरीचे अध्यक्ष संदीप जोशी, उपाध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, संचालक पाणिनी तेलंग, अ‍ॅड. संदीप शास्त्री, अनिरुद्ध भगत, डॉ. सुजाता देव प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम दक्षिण अंबाझरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री म्हणाले, विज्ञानाच्या प्रसारासाठीच फिरत्या प्रयोगशाळांचा प्रयोग सरकार राबवते आहे. राज्यात हवामान खात्याचे ५४ वेदर स्टेशन आहेत पण शासनातर्फे २०५९ वेदर स्टेशन निर्माण करण्यात येणार असून त्याद्वारे प्रत्येक दोन तासाला हवामानाची काय स्थिती आहे ते ग्रामपंचायतीला कळेल. सॅटेलाईट बेस यंत्रणा मुंबई, नागपूर आणि पुणे येथे उभारुन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विज्ञानाच्या उपयोगातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करते आहे, असे ते म्हणाले.
सुरेश सोनी म्हणाले, विज्ञान ही आपल्या देशाची अनिवार्यता आहे आणि रज्जुभैयांच्या नावाने या एक्सप्लोरेटरीतून एक नवा प्रारंभ होतो आहे.
सिद्धांतांचे महत्व असतेच पण त्याचे प्रत्यक्षीकरण प्रयोगांनी व्हावे आणि जनतेच्या समस्या सुटाव्यात. आपल्याजवळ कितीही ज्ञान असले आणि संशोधन केले तरी मानवी भावनांची संवेदना असल्याशिवाय विज्ञानाचाही समाजाला उपयोग होत नाही. त्यामुळे संवेदना जपण्याचेही काम झाले पाहिजे, असे सांगून त्यांनी काही उदाहरणे दिलीत. विवेक सावंत यांनी एक्सप्लोरेटरीने नागपुरातील एखाद्या विद्यार्थ्यालाही नोबेल मिळावे, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
नागपूर करणार प्लास्टिकमुक्त
प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते आहे. पर्यावरणासाठीही प्लास्टिक घातक आहे. या एक्सप्लोरेटरीच्या माध्यमातून सातत्याने काही प्रकल्प राबविण्यात येणार असून प्रथम प्रकल्पात नागपूर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प आहे. यासाठी रिसायकलिंग करता येणाऱ्या पिशव्या नागरिकांना देण्यात येतील, असे मत एक्सप्लोरेटरीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्लास्टिकमुक्त पिशवीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जोशी यांनी एक्सप्लोरेटरीची माहिती आणि निर्मितीची प्रक्रिया सांगितली.
विज्ञानाचाही अंधविश्वास निर्माण होऊ नये
भौतिक विज्ञानाने आतापर्यंत जे सिद्ध केले तेवढेच प्रमाण मानून इतर साऱ्या शक्यतांना नाकारणे चुकीचे आहे. जे आपण जाणत नाही ते नाकारणे हा दृष्टिकोन वैज्ञानिक नाही. अशा प्रकारचा विज्ञानाचाही अंधविश्वास निर्माण होऊ नये. विज्ञानाच्या आवाक्यात न आलेल्या अनेक शक्यतांचा शोध घेणे अद्याप शिल्लक आहेच. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक संस्था काम करतात पण विज्ञानाची अंधश्रद्धा निर्माण होऊ नये, असे आवाहन सुरेश सोनी यांनी यावेळी केले.

Web Title: The science-based society is very independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.