जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST2021-01-22T04:08:08+5:302021-01-22T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळा आता उघडण्यास सुरुवात झाली ...

जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळा आता उघडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा उघडल्यानंतर आता शासनाने येत्या २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात लेखी संमती घेण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापूर्वी जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू केल्या असून, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे. आज ग्रामीण भागातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या जवळपास एकूण विद्यार्थी संख्येच्या ३५ टक्क्यांवर विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहत आहेत. यापूर्वी वर्ग सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे, शाळेचे वेळापत्रक व इतर सर्व सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या होत्या. त्याच सूचना कायम राहणार आहेत. ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या १८१० वर शाळा असून १ लाख ५० हजारावर विद्यार्थी पटसंख्या आहे, तर १६ हजार १०० वर शिक्षकांची संख्या आहे.
कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायमच आहे. त्यातच आता शाळाही सुरू होत आहेत. हे सर्व लक्षात घेता जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरित करण्यात येतील, असेही कुंभेजकर यांनी सांगितले आहे.