गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

By Admin | Updated: December 6, 2015 03:28 IST2015-12-06T03:28:13+5:302015-12-06T03:28:13+5:30

गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले,

School girl child commits suicide due to poverty | गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

गरिबीच्या चटक्यांमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

शारीरिक अन् मानसिक वेदना : तिने करून घेतली सुटका
नागपूर : गरिबीचे चटके मुलांना लहानपणातच मोठे बनविते. कळकळ, तळमळ त्यांच्या लवकरच लक्षात येते. काय चांगले, काय वाईट त्याची जाण नसली तरी आपल्यामुळे आप्तांना होत असलेला त्रास त्यांना जाणवतो. त्यातून अस्वस्थ झालेली काही अल्पवयीन मुलं आत्मघातकी निर्णय घेतात. असाच निर्णय घेत रागिणी बबन बोरकर (वय १३) या शाळकरी मुलीने शनिवारी सकाळी गळफास लावला अन् स्वत:ची शारीरिक व मानसिक त्रासातून सुटका करून घेतली. तिच्या आत्महत्येनंतर चर्चेला आलेल्या परिस्थितीमुळे मानकापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मानकापूर हद्दीत पिटेसूर खाण वस्ती आहे. येथे बबन बोरकर (वय ३५) राहतो. तो खाणीवर चालणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर होता. काम बंद झाल्याने सध्या तो मिळेल ते काम करतो. त्याची पत्नी धनश्री मोलमजुरी करते. त्यांना रागिणी आणि अन्य दोन मुले आहेत. दिवसभर कमवायचे आणि रात्रीची सांज भागवायची, अशी या कुटंबाची स्थिती आहे. त्यांच्या झोपडीला धड दारही नाही. तेथे बाकी गोष्टीची काय सोय असेल याची कल्पना केलेलीच बरी. बबनची मोठी मुलगी रागिणी आठव्या वर्गात शिकत होती. तिला काही तासांपासून डोक्याच्या त्रासाचा आजार जडला. परिस्थिती नसूनही बबन आणि त्याची पत्नी रागिणीला दवाखान्यात नेत होते. मात्र, आराम पडत नव्हता. रागिणीला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत होत्या. घरी दोन दोन दिवस खायची सोय नसताना डोकेदुखीच्या वेदना, त्यात स्वत:सोबतच आईवडिलांची होणारी परवड तिला कमालीचा मानसिक त्रास देत होती. स्वत:चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नव्हता अशात आपल्या आजारामुळे आईवडिलातील विसंवादाने ती अस्वस्थ झाली आणि शनिवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत तिने चिंध्यांची दोरी बनवून गळफास लावून आत्महत्या केली. शेजारची महिला झोपडीसमोरून जात असताना तिला रागिणी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरड केली. शेजारी गोळा झाले. बबन आणि धनश्रीलाही शेजाऱ्यांनी शोधून आणले.(प्रतिनिधी)

गरीब शेजाऱ्यांची धावपळ
दारिद्र्याचे चटके अन् पोटाची आग यामुळे मेटाकुटीला आलेली बबन बोरकरची दोन मुले आठ दिवसांपासून नाशिकला मामांकडे गेली. ती तेथेच आहे. इकडे रागिणीने स्वत:ची अशा प्रकारे सुटका करून घेतली. गोळा झालेल्या शेजाऱ्यांनी धावपळ करीत रागिणीच्या अंत्यसंस्काराची तयारी करतानाच बोरकर दाम्पत्यालाही सावरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रशासन आणि समाज आता या कुटुंबाची कशी मदत करतो, त्याकडे पिटेसूर वस्तीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: School girl child commits suicide due to poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.