शाळा नोंदणीला २६ पर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: February 23, 2015 02:28 IST2015-02-23T02:28:18+5:302015-02-23T02:28:18+5:30
‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळांना २१ फेब्रुवारीपर्यंत ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची होती.

शाळा नोंदणीला २६ पर्यंत मुदतवाढ
नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळांना २१ फेब्रुवारीपर्यंत ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची होती. परंतु संकेतस्थळ अतिशय संथपणे सुरू असल्यामुळे अनेक शाळांना अद्याप नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे शाळांना याकरिता २६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पहिल्या टप्प्याला सोमवार १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. परंतु २१ तारखेपर्यंत १०० शाळांनादेखील नोंदणी करता येणे शक्य झाले नव्हते. ज्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे, ते अत्यंत संथ सुरू असल्यामुळे शाळांना अडचणी आल्या.
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे शाळांकडून बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच माहिती अपलोड करण्यासाठी प्रवेशप्रक्रियेस एक आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणीही करण्यात आली. त्यानुसार, शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांनी शिक्षण आयुक्तांना पत्र पाठविले. त्यात शाळांना माहिती अपलोड करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्याची मागणी करण्यात आली. अखेर ही मुदतवाढ देण्यात आली.नव्या वेळापत्रकानुसार शाळांना २६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करायची आहे; तर पालकांना २७ मार्च ते ११ मार्च या कालावधीत ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करायचे आहेत.(प्रतिनिधी)
पालकांपुढे संभ्रम
केवळ ४०० शाळांच्या ‘लोड’मुळे संकेतस्थळ प्रचंड संथ झाले आहे. ज्यावेळी पालकांना ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करायचे असतील तेव्हा हजारो पालक एकाच वेळी ‘लॉगईन’ करतील. तेव्हा संकेतस्थळ सुरळीत चालेल का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.