शाळा संचालकाने केला बाेगस करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:42+5:302021-06-27T04:07:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : शाळा संचालकाने थकीत किराया न देता इमारतीचा परस्पर करार केला आणि ताे करार जिल्हा ...

The school director made the Bagus agreement | शाळा संचालकाने केला बाेगस करार

शाळा संचालकाने केला बाेगस करार

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : शाळा संचालकाने थकीत किराया न देता इमारतीचा परस्पर करार केला आणि ताे करार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सादर केला, असा आराेप इमारत मालकाने केला असून, पाेलिसात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, शाळा संचालकाने इमारत मालकाने केलेले आराेप फेटाळले आहेत.

कैलास बोरकर यांची शिक्षण संस्था असून, त्यांनी कन्हान (ता. पारशिवनी) शहरात उदयभान प्रौढ मतिमंद निवासी शाळा सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी सन २०१५ मध्ये आगैया शेट्टी, रा. कन्हान यांची शिवनगर, कन्हान येथील इमारत किरायाने घेतली. या इमारतीच्या कराराची मुदत ११ महिने तर किराया प्रति महिना सात हजार रुपये ठरवण्यात आला.

दरम्यान, कैलास बाेरकर यांनी या इमारतीचा सन २०१८ पासून किराया दिला नाही. एवढेच नव्हे तर कराराचे नूतनीकरणही केले नाही. असे असताना त्यांनी सन २०१९-२० या वर्षासाठी इमारतीचा आपल्या अपराेक्ष करार केला आणि ताे करार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केला, असा आराेप इमारत मालक आगैया शेट्टी यांनी केला असून, कैलास बाेरकर यांच्या विराेधात पाेलिसात तक्रार दाखल केली आहे.

दुसरीकडे, कैलास बाेरकर यांनी या आराेपाचे खंडन करीत आपल्याकडे इमारतीचा किराया थकीत नाही. शासनाकडून अद्यापही घरभाडे मिळालेले नाही. आपण चार लाेकांसमक्ष करार केला आहे. त्यामुळे आपल्यावर करण्यात आलेले आराेप बिनबुडाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद केली असल्याचे पाेलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: The school director made the Bagus agreement