स्कूल बस नियमावलीला ठेंगाच
By Admin | Updated: May 21, 2014 01:09 IST2014-05-21T01:09:43+5:302014-05-21T01:09:43+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली. मात्र २० टक्के स्कूल बसचालकांनी अद्यापही नियमांची पूर्तता केलेली नाही. शाळांना सुट्या असतानाही

स्कूल बस नियमावलीला ठेंगाच
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली. मात्र २० टक्के स्कूल बसचालकांनी अद्यापही नियमांची पूर्तता केलेली नाही. शाळांना सुट्या असतानाही स्कूल बसचालक नियमांची पूर्तता करण्यास गंभीर नसल्याचे चित्र आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने कठोर भूमिका घेतली आहे. आता दोषी आढळून आलेल्या स्कूल बसेसवर तब्बल ३० दिवसांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात एकूण ४५२ स्कूल बसेस आहेत. यातील पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत २२४ तर पश्चिम आरटीओ कार्यालयांतर्गत २२८ स्कूल बसेस येतात. यातील ८० स्कूल बसेसनी नियमांची पूर्तताच केलेली नाही. स्कूल बससाठी आवश्यक नियमावलीचे पालन करण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये स्कूल बस परिवहन समिती स्थापन करण्याचे आवाहन आरटीओ करीत आहे. याशिवाय कार्यशाळेच्या माध्यमातून शाळांना स्कूल बस कशी असावी, याची माहितीही देण्यात येत आहे. परंतु विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी आपली नाहीच, असे गृहित धरीत आजही अनेक शाळा दुर्लक्ष करीत आहे. स्कूल बसकडून नियमांची पूर्तता करण्याकडे विशेष लक्षच दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. नियमांची पूर्तता होत नसल्याचे पाहून आरटीओ वेळोवेळी दोषी स्कूल बसेसवर थेट निलंबनाचीच कारवाई करते. लाखो रुपयांचा दंड वसूल होतो. यात शाळेसोबतच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. परंतु स्कूल बसचालक किंवा शाळा संचालक याला गंभीरतेने घेत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर शाळा उदासीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळा टाळत असल्याचे दिसून येत आहे. शहरात १५०० शाळांमधून फक्त २४७ शाळांनी स्कूल बस परिवहन समिती स्थापन केल्या आहेत. तब्बल १ हजार २५३ शाळांमध्ये ही समितीच कार्यान्वित झाली नाही. यामुळे शाळांतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. सोबतच स्कूल बसची नोंदणीपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, अग्निशामक व प्रथमोपचार पेटी आहे की नाही, याकडेही दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)