स्कूल बसने बालकाला चिरडले
By Admin | Updated: January 30, 2016 03:13 IST2016-01-30T03:13:28+5:302016-01-30T03:13:28+5:30
घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

स्कूल बसने बालकाला चिरडले
दुसरा गंभीर : बिडीपेठमध्ये प्रचंड तणाव
नागपूर : घरासमोर खेळणाऱ्या दोन भावंडांना भरधाव स्कूल बसने चिरडले. त्यात दीप संतोष पाल या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर, त्याचा अडीच वर्षीय भाऊ दीपक गंभीर जखमी झाला. सक्करदऱ्यातील न्यू बिडीपेठ भागात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
संतोष पाल (वय ३०) उमाकांत सोनवणे यांच्या घरी भाड्याने राहातो. रस्त्याला लागून असलेल्या घरामुळे संतोषची दोन्ही मुलं शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अंगणात खेळत होती. त्यांची आई दारात बसून मुलांचे कौतुक पाहत होती. अचानक स्कूल बस (एमएच ४९/ जे ०११०) वेगात आली आणि दीप तसेच दीपकला चिरडले. ते पाहून त्यांची आई आरडाओरड करीत समोर आली. तिने मुलांना कसेबसे बाहेर ओढले. गंभीर अवस्थेतील या चिमुकल्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या दीपला मृत घोषित केले. दिवसाढवळ्या झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. या अपघाताला स्कूल व्हॅन चालकासह महापालिका प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी लावला. या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी रस्त्यालगत घरे असल्याने आणि वाहनांची मोठी वर्दळ असल्याने स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली.
आई वडिलांवर आघात
या अपघातामुळे पाल दाम्पत्यावर जोरदार मानसिक आघात झाला आहे. डोळ्यादेखत चिमुकला गमावल्याने या दोघांची अवस्था वेड्यागत झाली आहे. परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपी वाहनचालकाला अटक झाली की नाही ते पोलिसांकडून स्पष्ट झाले नव्हते.