नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यातील वर्ग १ ते १२ च्या शाळा मंगळवार १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. शासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील संपूर्ण शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचे संक्रमण आणि त्याची गंभीरता लक्षात घेता, स्थानिक अधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे शासनाने निर्देशित केले होते. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मनपा आयुक्तांनी शहरातील व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली.
शाळा सुरू करण्यापूर्व प्रशासनाने आरोग्य, स्वच्छता व सुरक्षेविषयक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करायचे आहे. शिवाय शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी बैठक व्यवस्था ठेवावी. शाळांमध्ये मधली सुट्टी राहणार नाही. या नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शाळांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे.
- जिल्ह्यात दोन सत्रातील शाळा सुरू-बंदचा तपशील
१६ मार्च २०२० रोजी शाळा बंद झाल्या.
१४ डिसेंबर २०२० रोजी ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यात आले.
४ जानेवारी २०२१ रोजी शाळा बंद झाल्या
१५ जुलै २०२१ पासून वर्ग ८ ते १२ च्या ग्रामीण भागातील शाळा सुरू
४ ऑक्टोबर २०२१ पासून वर्ग ६ व ७ च्या ग्रामीण भागातील शाळा सुरू
१ डिसेंबर २०२१ पासून १ ते ५ चे ग्रामीण भागातील वर्ग सुरू
८ जानेवारी २०२२ पासून संपूर्ण शाळा बंद
१ फेब्रुवारी २०२२ पासून शाळा सुरू
- शहरातील १ ते ४ वर्गाच्या शाळा पहिल्यांदा होणार सुरू
महापालिका आयुक्तांनी १ ते १२ च्या शाळा सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. शहरात आतापर्यंत ५ ते १२ च्या शाळा सुरू झाल्या होत्या. पण १ ते ४ वर्ग सुरू झाले नव्हते. दोन वर्षानंतर मंगळवारी पहिल्यांदाच १ ते ४ वर्गाचा विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष जाणार आहे.