मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
By Admin | Updated: July 7, 2014 00:56 IST2014-07-07T00:56:13+5:302014-07-07T00:56:13+5:30
महाविद्यालय व विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राखीव संवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. याच धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या

मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
गरीब विद्यार्थ्यांना लाभ : आॅनलाईन भरावे लागणार अर्ज
वरोरा : महाविद्यालय व विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राखीव संवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. याच धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती देण्याचे शासनाने ठरविले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक अंतर्गत राज्यातील शेकडो अभ्यास केंद्रातून विविध अभ्यासक्रम मागील काही वर्षांपासून शिकविले जात आहेत. शासकीय व खासगी सेवेत कार्यरत असताना नियमीत महाविद्यालयात नियमाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही किंवा व्यवसाय करून वेळेअभावी शिक्षण घेता येत नाही. अशा व्यक्तींनी शिक्षणापासून वंचीत राहु नये, याकरिता मुक्त विद्यापिठ महाराष्ट्रातील शेकडो अभ्यासक्रमा केंद्रातून शिक्षण देत असते. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच मार्गदर्शन करण्यात येते व शैक्षणिक सत्राच्या अखेरीस परीक्षा घेण्यात येते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्यानंतर ही पदवी इतर विद्यापिठाच्या समकक्ष असल्याने अनेक होतकरू तसेच परिस्थितीअभावी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे.
मुक्त विद्यापिठात प्रवेश घेताना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क आकारण्यात येते. या शुल्काचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये, याकरिता शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विशेष समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्यामार्फत भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. त्यात युजर आयडी, पासवर्ड प्रवेश घेतलेल्या अभ्यास केंद्रात द्यावे लागणार आहेत. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आदी शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. या शिष्यवृत्तीचा लाभ मुक्त विद्यापिठातून शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरून विद्यार्थ्यांना होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)