जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर

By Admin | Updated: July 7, 2015 02:40 IST2015-07-07T02:40:42+5:302015-07-07T02:40:42+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे

Schedule announcement results on the website | जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर

जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर

नागपूर विद्यापीठ : प्र-कुलगुरूंनी घेतला पुढाकार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशास्थितीत लवकरातलवकर निकाल लावणे अन् परीक्षा विभागाच्या विस्कळीत कारभाराची घडी सुरळीत करणे ही आव्हाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्वीकारली आहे. या अंतर्गतच त्यांनी २५ जुलैपर्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश परीक्षा विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच कोणकोणत्या दिवशी कुठले निकाल जाहीर करण्यात येतील याची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या निकालांची गाडी यंदा रुळावरूनच घसरली आहे. परीक्षा विभाग प्राध्यापकांकडे बोट दाखवत आहे तर प्राध्यापक विद्यापीठाच्या धोरणांना दोषी ठरवत आहे. अशास्थितीत नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे होत आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या एकूण ९५२ परीक्षांपैकी केवळ ३३७ निकालांची घोषणा करण्यात आली आहे.
अनेक परीक्षा होऊन तर दोन महिने उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांकडून निर्माण होणारा दबाव लक्षात घेता विद्यापीठाने बीए, बीकॉम व बीएस्सीचे अंतिम वर्षांचे निकाल जाहीर केले.
परंतु इतर निकालांचे काय अशी सातत्याने विचारणा होत आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. परंतु निकालच लागले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये उत्साह नाही व त्यामुळे अनेक ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये उपस्थिती रोडावल्याचे दिसून येत आहे.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी आता संकेतस्थळावर निकाल जाहीर होण्याची तारीख टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

प्रत्येक सोमवारी प्रकाशित होणार यादी
या निर्णयानुसार आता प्रत्येक सोमवारी प्रस्तावित निकालाची तारखेसह यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. सध्या ७ ते २५ जुलैदरम्यान ७७ निकालांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. आता नियमितपणे ही यादी प्रसिद्ध होईल व यात खंड पडणार नाही, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Schedule announcement results on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.