‘ट्रायल’साठी निधीचा तुटवडा
By Admin | Updated: November 6, 2014 02:42 IST2014-11-06T02:42:51+5:302014-11-06T02:42:51+5:30
नागपूर-सिकंदराबाद दरम्यान हायस्पीड रेल्वेगाड्या १३० किलोमीटरच्या गतीने चालविण्यासाठी ‘ट्रायल’ घेण्यात निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

‘ट्रायल’साठी निधीचा तुटवडा
आनंद शर्मा नागपूर
नागपूर-सिकंदराबाद दरम्यान हायस्पीड रेल्वेगाड्या १३० किलोमीटरच्या गतीने चालविण्यासाठी ‘ट्रायल’ घेण्यात निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला त्यासाठी ३५ कोटी हवे आहेत. या रकमेमुळे या मार्गावर ट्रॅक, सिग्नल, पुल आदीशी निगडित सुधार कामे करावयाची आहेत. परंतु निधी न मिळाल्यामुळे ही कामे रखडली आहेत. यामुळे १३० किलोमीटरची गतीची ‘ट्रायल’ रखडली असून या मार्गावर १६० किलोमीटरच्या गतीने गाड्या कधी धावतील हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-बिलासपूर दरम्यान १६० किलोमीटरच्या गतीने रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली होती. १६० किलोमीटरपूर्वी १३० किलोमीटर स्पीडच्या गतीसाठी ३५ कोटी रुपये आणि १६० किलोमीटरच्या गतीसाठी १५० कोटी रुपये रेल्वे प्रशासनाला हवे आहेत. ही रक्कम मिळाल्यानंतरच नागपूर-सिकंदराबाद दरम्यान बल्लारशापर्यंत रेल्वे रुळ, सिग्नल, पूल आदीशी निगडित कार्य पूर्ण होऊ शकतील. त्यानंतरच ही ‘ट्रायल’ घेणे शक्य होणार आहे. सप्टेबर महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी सांगितले की १६० किलोमीटरच्या पूर्वी १३० किलोमीटरच्या गतीने ‘ट्रायल’ आॅक्टोबर महिन्यात घेण्यात येऊ शकते. त्यामुळे रेल्वे रुळाच्या स्थितीची माहिती मिळेल. भविष्यात कोणती कामे करावयाची आहेत याचाही खुलासा होईल. या कामाचा सर्वेक्षण अहवाल मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी नागपुरात आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी हायस्पीड रेल्वेगाड्यांविषयीची माहिती रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली होती. परंतु निधीची व्यवस्था न झाल्यामुळे हे काम रखडल्याची माहिती आहे.