साडेनऊ कोटींची बनवाबनवी

By Admin | Updated: December 25, 2016 02:58 IST2016-12-25T02:58:56+5:302016-12-25T02:58:56+5:30

बनावट धनादेश बँकेत जमा करून साडेनऊ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला.

Sawdew of Rs | साडेनऊ कोटींची बनवाबनवी

साडेनऊ कोटींची बनवाबनवी

बँक अधिकाऱ्यांची सतर्कता : चष्मा विक्रेता गजाआड
नागपूर : बनावट धनादेश बँकेत जमा करून साडेनऊ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. ही बनवाबनवी उघड होताच अश्विन छाबरा (साबरा, बैरामजी टाऊन) नामक चष्मा विक्रेत्याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.
आॅप्टीकल शॉपचा संचालक असलेल्या अश्विनने स्टेट बँकेच्या रामदासपेठ शाखेत ९ कोटी, ५७ लाखांचा धनादेश जमा केला. हा धनादेश गुरुवारी सकाळी बँक अधिकाऱ्यांपुढे क्लिअरिंगसाठी आला. मोठ्या रकमेचा धनादेश पाहून बँक व्यवस्थापक सतीश शिवपाल सिंघानिया (रा. कांचनसागर अपार्टमेंट धंतोली) यांनी रक्कम वळती करण्यापूर्वी ज्या बँकेचा हा धनादेश होता, त्या उत्तर प्रदेशातील बँक व्यवस्थापनाशी आॅनलाईन संपर्क साधला. लगेच तेथून प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक बँक अधिकाऱ्यांनी धनादेश वटविण्याची प्रक्रिया थांबवली. दुसऱ्या दिवशी स्थानिक बँक अधिकाऱ्यांना एक ई-मेल मिळाला. त्यातून तो धनादेश वटविण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले होते.
मात्र, मोठ्या रकमेच्या व्यवहाराच्या वेळी वापरण्यात येणारी सांकेतिक भाषा नसल्याने त्या मेलबद्दल बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे नंतर फोनवर संपर्क करण्यात आला. तेव्हा संबंधित बँक प्रशासनाने आपण तसा मेलच पाठविला नाही आणि तो धनादेश आपल्या बँकेचा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सतीश सिंघानिया यांनी सीताबर्डी पोलिसांशी संपर्क केला. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लगेच अश्विन छाबराला ठाण्यात चौकशीसाठी बोलविले.
लखनौच्या एका एनजीओला वर्षभर चष्मे पुरविले. त्या बदल्यात आपल्याला ब्रिटो नामक व्यक्तीकडून चेक मिळाल्याचे अश्विनने सांगितले. त्याने ब्रिटोबाबत दिलेल्या माहितीची, संपर्क क्रमांकाची शहानिशा केली असता ती सर्व बनवाबनवी असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी अश्विनला वेगळ्या पद्धतीने बोलते केले. तेव्हा मात्र अश्विन गडबडला.(प्रतिनिधी)

मेलही हॅक केला
चष्मे खरेदी विक्रीचा कोणताही व्यवहार झाला नाही. कागदोपत्री व्यवहार दाखवून चेक वटल्यास ३० टक्के कमिशन आपल्याला ब्रिटोने देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे आपण हा धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अश्विनने पोलिसांकडे दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील बँक व्यवस्थापनाला पाठविलेला ई-मेलही अश्विनच्या साथीदाराने हॅक केल्याचे पुढे आले. त्यामुळे पीएसआय संदीप गवई यांनी शुक्रवारी रात्री अश्विनला अटक केली. शनिवारी कोर्टातून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Sawdew of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.