सत्येंद्रचा बेत पोलिसांनी उधळला

By Admin | Updated: July 13, 2015 02:35 IST2015-07-13T02:35:00+5:302015-07-13T02:35:00+5:30

महाराष्ट, मध्यप्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार सत्येंद्र गुप्ता शनिवारी रात्री जबलपूरमध्ये प्रेयसीसोबत सैरसपाटा करण्याच्या बेतात होता.

Satyendra's plan was spoiled by the police | सत्येंद्रचा बेत पोलिसांनी उधळला

सत्येंद्रचा बेत पोलिसांनी उधळला

प्रेयसीसोबत करणार होता सैरसपाटा : पोलिसांनी घातली झडप
नागपूर : महाराष्ट, मध्यप्रदेशात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुन्हेगार सत्येंद्र गुप्ता शनिवारी रात्री जबलपूरमध्ये प्रेयसीसोबत सैरसपाटा करण्याच्या बेतात होता. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने त्याच्या प्रेयसीदेखतच त्याच्यावर झडप घातली आणि त्याचा सैरसपाट्याचा बेत उधळून लावला. भुशाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधावी तसे मोनिका किरणापुरेचे मारेकरी शोधून काढण्याची प्रशंसनीय कामगिरी चार वर्षांपूर्वी नागपूर गुन्हेशाखा पोलिसांनी बजावली होती. तशाच प्रकारे धागादोरा नसताना तब्बल सव्वातीन महिने निरंतर प्रयत्न करून खतरनाक सत्येंद्र गुप्ताला शोधण्याची कामगिरी गुन्हेशाखेच्या पथकाने बजावली आहे.
क्रूर आणि धूर्त असलेल्या गुप्तावर खुनाचे २, मोक्काचे २, खुनाच्या प्रयत्नाचे ४, दरोड्याचे ५ आणि जबरी चोरीचे २ आणि अन्य एक असे महाराष्ट्रात १६ तर, मध्यप्रदेशात ७ असे एकूण २३ गुन्हे आहेत.
कारागृहातून, पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्यात तो सराईत आहे. मध्यप्रदेशातील लखनादौन कारागृहात बंदिस्त असताना तो राजा गौस, बिशन उईके, शेख वाजिद, शेख मोहम्मद आणि अमरजीत शेरसिंग या साथीदारांसह पळून गेला होता. मध्यवर्ती कारागृहातून पळून बाहेर येताच त्याने वाहन चोरले. त्याच्या ताब्यातील वाहन चोरीचे असल्याचे लक्षात आल्यामुळे बैतूल पोलिसांनी त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र, गुप्ताने पोलिसांवर गोळीबार करीत पलायन केले. त्यानंतर तो गायब झाला. त्याला अटक करणे नागपूर पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. मात्र, शिबू आणि नेपाली पकडले गेल्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला होता. नातेवाईकांशीही संपर्क तोडला होता. त्यामुळे त्याचा धागाच पोलिसांना गवसत नव्हता. मात्र, पोलिसांचे खबरे आणि सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका वठवली. (प्रतिनिधी)
प्रेयसी बनली दुवा
गुप्ताची जबलपुरात प्रेयसी असल्याची माहिती पोलिसांना कळली. हा दुवा पकडून पोलिसांनी गुप्ताच्या मुसक्या बांधण्याची योजना तयार केली. त्यानुसार, गुप्ताच्या प्रेयसीचा मोबाईल नंबर मिळवल्यानंतर गुन्हेशाखेचे पाच जणांचे पथक सायबर सेलच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवू लागले. तो शनिवारी जबलपुरात तिला भेटायला येणार, हे कळाल्यामुळे तीन दिवसांपासून गुन्हेशाखेचे पथक गुप्ताची पे्रयसी ज्या भागात राहाते त्या भागात वेशांतर करून फिरू लागले. अखेर शनिवारी रात्री गुप्ताने तिला एका रेस्टॉरंटमध्ये बोलविले. ती बाहेर पडताच पोलीस सतर्क झाले. प्रेयसीला भेटायला आलेला गुप्ता नजरेस पडताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला कसलीही संधी न देता वाहनात कोंबण्यात आले.
धोका पत्करला
पोलिसांनी ज्या ज्या वेळी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, त्या त्या वेळी त्याने पोलिसांवर हल्ला चढवला. आता पोलिसांच्या हातात सापडलो तर पुन्हा बाहेर पडायला संधी नाही, याची त्याला खात्री होती. त्यामुळे तो झोपतानाही पिस्तुल, चाकू सोबत ठेवत होता. अशात त्याच्यावर झडप घालणे मृत्यूवर झेपावण्यासारखे होते. मात्र, गुन्हेशाखेच्या दिलेर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो धोका पत्करला. गुप्ताला जेरबंद करून नागपुरात आणण्यात आले. त्याच्याकडून १ एप्रिल ते १० जुलैपर्यंतच्या वास्तव्याची, त्याने केलेल्या गुन्ह्याची, त्याला साथ देणारांची माहिती पोलिसांनी मिळवली असून, जेल ब्रेकच्या या मास्टर मार्इंडला अटक केल्यानंतर आता गुन्हेशाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी या कामगिरीबद्दल पत्रकार परिषदेत गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांचे कौतुक केले तर, मासिरकर यांनी या कामगिरीचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले आहे.

Web Title: Satyendra's plan was spoiled by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.