सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वाधिक ६७.५१ टक्के पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:07+5:302021-07-28T04:09:07+5:30
राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी मागील काही वर्षांपासून २४ ...

सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वाधिक ६७.५१ टक्के पाण्याची नासाडी
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी मागील काही वर्षांपासून २४ बाय ७ योजना राबविली जात आहे. असे असूनही ४५.२६ टक्के पाण्याची नासाडी होते. सर्वाधिक ६७.५१ टक्के पाण्याची नासाडी सतरंजीपुरा झोनमध्ये होत आहे.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गळतीतून मनपाला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. याबाबतची आकडेवारी नागपूर एन्व्हायरमेंटल सर्विसेस लिमिटेड (एनईएसएल) च्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली. यावरून पाण्याची गळती (नासाडी) रोखण्यात मनपाच्या जलप्रदाय विभागाला अपयश आले आहे. नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो.
विशेष म्हणजे वर्ष २०१९ मध्ये शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. दिवसाआड पाणी पुरवठा होत होता; मात्र प्रशासन अजूनही जागे झालेले नाही. पाणी गळती रोखता आलेली नाही. झोन स्तरावरील आकड्यांचा विचार करता सतरंजीपुरा झोनला ८४.६८ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो; परंतु यातील २९.३९ पाण्याची बिलींग होते. ६७.५१ टक्के पाण्यावर बिल आकारले जात नाही. सर्वाधिक ८८.०४ एमएलडी पाणी पुरवठा धरमपेठ झोनला केला जातो. यातील ५२.७० टक्के पाण्याचे बिलींग केले जाते. तर ४०.१४ टक्के पाण्याचे बिलींग होत नाही.
लक्ष्मी नगर झोनमध्ये ५१.७६ एमएलडी पाणी पुरवठ्यापैकी ४०.३३ एमएलडी पाण्याचे बिलींग केले जाते. २२ टक्के पाण्याचे बिलींग होत नाही. असे असले तरी इतर झोनच्या तुलनेत या झोनमधील परिस्थिती चांगली आहे. पाण्याची नासाडी होण्यात सतरंजीपुरा झोन नंतर आसीनगर, गांधीबाग झोन येतो. येथे अनुक्रमे ५७.४८ व ५३.०१ टक्के पाण्याचे बिलींग होत नाही.
.....
गळतीची मोठी समस्या
नागपूर शहरात ३५०० कि.मी. लांबीच्या पाइपलाइन नेटवर्कच्या माध्यमातून घरापर्यंत पाणी पुरवठा केला जातो. एकूण २ लाख ५७ हजार ८७२ पाणी ग्राहक आहेत. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचा दावा जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. ५० ते ५५ टक्के अवैध नळ असल्याने मनपाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. वास्तविक गळती रोखून व अवैध जोडण्या बिलींगमध्ये आणने शक्य आहे.
....
झोन एकूण पाणी पुरवठा बिलाची आकारणी नाही( आकडे एमएलडी)
लक्ष्मी नगर ५१.७६ ४०.३३ २२.०२
धरमपेठ ८८.०४ ५२.७० ४०. १४
हनुमान नगर ४०. २६ २७.१७ ३२.५२
धंतोली २५.८८ १४.३३ ४४.६३
नेहरू नगर ५४.१४ ३०.२३ ४४.१६
गांधीबाग ५३.२६ २५.०३ ५३.०१
सतरंजीपुरा ८४.६८ २७.३९ ६७.५१
लकडगंज ५१.४२ २९.३९ ४२.८४
आसी नगर ७२.०५ ३०.६४ ५७.४८
मंगळवारी ५४.५१ २७.९३ ४८.२८