संस्कृत सर्व भाषांची आत्मा, प्रोत्साहन देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:12+5:302021-01-16T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संस्कृत ही सर्व भाषांची आत्मा आहे. संस्कृतला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भाषेचा ...

संस्कृत सर्व भाषांची आत्मा, प्रोत्साहन देण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कृत ही सर्व भाषांची आत्मा आहे. संस्कृतला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भाषेचा विकास आणि प्रसार करणे ही केवळ विद्यापीठ किंवा शिक्षकांची जबाबदारी नाही, तर सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्रोत केंद्राचे त्यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, राजश्री जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते. संस्कृतमध्ये सखोल वेदज्ञान आहे. जगात योग आणि आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळाली आहे. याचा सखोल अभ्यास व संशोधन होणे आवश्यक आहे. नागपूर देशाचा केंद्रबिंदू असून, येथूनच याची सुरुवात होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने नवीन राष्ट्रीय धोरणात भाषांना महत्त्व दिले आहे. स्थानिक भाषेतच प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे, असे त्यात नमूद आहे. हे पाहता संस्कृतप्रमाणे इतर भाषांवर लक्ष दिले गेले पाहिजे. डॉ. श्रीकांत जिचकार हे बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. संस्कृतला प्रोत्साहन देण्यात त्यांचे मौलिक योगदान होते, असे राज्यपाल म्हणाले. या समारंभात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश शुक्ल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
खोकला बरा होत नाही
महाराष्ट्रात आल्यानंतर मला खोकला लागला व तो अद्यापही कायम आहे. तुम्ही किती मराठी शिकली अशी अनेकदा पत्रकार विचारणा करतात. माझा खोकला बरा होत नाही हे बोलणे मी शिकलो असल्याचे त्यांना सांगतो, असे राज्यपालांनी सांगितले.
गडमंदिरात दर्शन
विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी रामटेकच्या गडमंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजादेखील केली. राम सर्वांचे आहेत, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या निवासस्थानीदेखील भेट दिली.