खंडणी वसुलीसाठी संजय खापेकरची हत्या
By Admin | Updated: April 20, 2016 02:56 IST2016-04-20T02:56:03+5:302016-04-20T02:56:03+5:30
खंडणी वसुलीत अडसर ठरल्यामुळे पाच गुंडांनी संजय शामराव खापेकर (वय ३४, रा. तांडापेठ) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

खंडणी वसुलीसाठी संजय खापेकरची हत्या
नागपूर : खंडणी वसुलीत अडसर ठरल्यामुळे पाच गुंडांनी संजय शामराव खापेकर (वय ३४, रा. तांडापेठ) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. राधे ऊर्फ राधेश्याम शिवदास खोब्रागडे (रा. गड्डीगोदाम), भुऱ्या ऊर्फ शुभम विनायक बोणेकर (वय १९, रा. तांडापेठ) असे चारमधील दोन आरोपींची नावे आहेत. एक आरोपी अनोळखी असून, एक अल्पवयीन आहे.
आरोपी राधे कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो तांडापेठमधील कपड्याचे व्यापारी तसेच कारागिरांना धमकावून खंडणी वसूल करीत होता. संजय ज्या कारखानदाराकडे सलवार सूटच्या प्रेसचे काम करायचा तेथे येऊन राधे आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वी खंडणीची मागणी केली होती. संजयने तीव्र विरोध करून कारखानदाराला खंडणी देण्यापासून रोखले होते. त्यामुळे राधे आणि त्याचे साथीदार चिडून होते. संजय खंडणी वसुलीच्या आड येत असल्यामुळे आरोपींनी त्याला अनेकदा शिवीगाळ करून मध्ये येऊ नको, असा दमही दिला होता. मात्र, स्वाभिमानी संजय राधे आणि त्याच्या गुंडांच्या धमक्यांना भीक घालत नव्हता. या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन आरोपी आणि राधे काही दिवसांपासून संजयच्या मागे लागले होते. सोमवारी रात्री ९.४० ला संजयला पुन्हा शिवीगाळ करून आमच्या आडवे आला तर चांगले होणार नाही, अशी धमकी दिली. संजयनेही त्यांना या भागात खंडणी मागितल्यास परिणाम गंभीर होतील, असे म्हटले. त्यामुळे आरोपींनी संजयला मारहाण केली तर राधेने चाकूचे घाव घालून संजयला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. वर्दळीच्या ठिकाणी हा थरार घडल्यानंतर आजूबाजूच्यांनी संजयला उपचाराकरिता मेयोत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
संजयचा भाऊ दिलीप शामराव खापेकर (वय ३२) यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.(प्रतिनिधी)
परिसरात तणाव
परिसरात जिगरबाज म्हणून संजय ओळखला जायचा. तो वस्तीतील नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असायचा. त्यामुळे त्याच्या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संजयच्या वृद्ध माता-पित्यांना तसेच भावाला जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरातील नागरिकांचाही आधार गेला आहे. त्याची हत्या करणारा अल्पवयीन आरोपी नेतागिरी करणाऱ्याचा मुलगा आहे. संजयच्या हत्येनंतर आरोपींना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांना मदत पुरविण्यासाठी पाचपावलीतील अनेक जण धावपळ करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.