लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र, १०० वर्षाअगोदर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली तो दिवस २७सप्टेंबर १९२५ हा होता. त्यानुसार येत्या शनिवारी तारखेनुसार संघाची शताब्दी राहणार आहे. संघासाठी हादेखील ऐतिहासिक दिवसच राहणार असून, एकाच वेळी तीन ठिकाणांहून पथसंचलन निघणार आहे.
यावेळी हजारो स्वयंसेवक यात सहभागी होतील व एकाप्रकारे संघाचे देशाच्या केंद्रबिंदू असलेल्या झिरो माईल व व्हेरायटी चौकात शक्तिप्रदर्शन राहणार आहे. विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी विविध पातळ्यांवर संघाकडून तयारी सुरू आहे. अगदी देशविदेशांतदेखील निमंत्रणे दिली आहेत. सर्वसाधारणतः विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन होते व मग कार्यक्रम होतो.
त्याच्याअगोदर स्वयंसेवकांकडून दोन गटांमध्ये पथसंचलन होते. मात्र, यावेळी विजयादशमीच्या अगोदरच पथसंचलन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी शहरातून तीन ठिकाणांहून पथसंचलन निघेल. शहरातील बाराही भागातील स्वयंसेवकांचा यात समावेश असेल. वेगवेगळ्या ठिकाणाहून पथसंचलन निघणार असून तीनही गट सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात एकत्रित येतील. तेथेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे पथसंचलनाचे अवलोकन करतील.
'जेन झी'सह तरुणाईचा जास्त समावेश
नेपाळमधील राजकीय सत्ताबदलानंतर 'जेन झी'चा मुद्दा चर्चेत आला आहे. देशाच्या राजकारणातदेखील हा शब्द गाजतो आहे. संघाच्या पथसंचलनातदेखील 'जेन झी'च्या वयोगटासह तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश राहणार आहे. पथसंचलनात तरुणाईचे प्रमाणच अधिक असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.