संघाने दिला संपूर्ण काश्मीरचा नारा
By Admin | Updated: October 13, 2016 03:43 IST2016-10-13T03:43:00+5:302016-10-13T03:43:00+5:30
भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावरून काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे.

संघाने दिला संपूर्ण काश्मीरचा नारा
सरसंघचालकांचा पाकिस्तानवर प्रहार : ‘सर्जिकल स्ट्राइक’बाबत केंद्राला शाबासकी
नागपूर : भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावरून काश्मीर प्रश्न आणखी तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड काश्मीरचा नारा दिला आहे. संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टिस्तान या पाकव्याप्त काश्मीरमधील भागांसह संपूर्ण काश्मीरवर भारताचाच अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. मोदी सरकार व सैन्याला शाबासकी देत संपूर्ण काश्मीरबाबत केंद्र सरकारने आक्रमक भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनदेखील त्यांनी यावेळी केले. संघाच्या नव्या गणवेशातील हा पहिलाच विजयादशमी उत्सव होता हे विशेष.मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून १९७६ च्या भारतीय आर्थिक सेवेचे अधिकारी सत्यप्रकाश राय हे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्कराने जे काम करून दाखवले ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतोय. भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनीतीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करीत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. सीमेपलीकडून काश्मिरातील जनतेला फूस लावण्याचे काम केले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. असे होऊ नये यासाठी तेथे विजयाबरोबरच विश्वासाचेही वातावरण निर्माण करावे लागेल, असे ते म्हणाले.आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार काम करणारे आहे, उदासीन नाही.