अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी
By Admin | Updated: July 20, 2014 01:19 IST2014-07-20T01:19:33+5:302014-07-20T01:19:33+5:30
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मेडिकलमध्ये वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच ही पदे भरण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये

अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी
नागपूर : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मेडिकलमध्ये वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच ही पदे भरण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळून जवळपास ४०० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेसोबतच महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवेवरही पडला आहे. या जागा भरण्यासंदर्भात महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाने अनेक निवेदने दिली. आंदोलनातून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. अनुकंपा तत्त्वाच्या ज्येष्ठता यादीत राजू सोनकर यांचा पहिला क्रमांक आहे.
परंतु, २००८ पासून नोकरीपासून तो वंचित आहे. न्याय मागण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंबच उपोषणावर बसले होते. अखेर या सर्वांची दखल घेण्यात आली आहे.
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काची पदे व अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. पदे भरण्यासंदर्भातील कारवाईला सुरुवातही झाली आहे. शनिवारी मेडिकलच्या सूचना फलकावर अशा १८० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यातील ज्येष्ठतेनुसार पद भरती करण्यात येणार आहे, परंतु किती टक्के ही भरती राहणार, याची माहिती कुणाचकडे उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)