Samrudhi Mahamarg; AfCons receives a penalty of Rs 244.64 crore | समृद्धी महामार्ग; अ‍ॅफकॉन्सला २४४.६४ कोटींच्या दंडाची नोटीस

समृद्धी महामार्ग; अ‍ॅफकॉन्सला २४४.६४ कोटींच्या दंडाची नोटीस

ठळक मुद्देसेलू तहसीलदारांची कारवाई१५ दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृद्धी महामार्गासाठी ३ लाख ९ हजार ६८०.३६८ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४४ कोटी ६४ लाख ७४ हजार ९०७.२ रुपये दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे. तसेच, यावर १५ दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कंपनीचे काहीच म्हणणे नाही असे समजून दंड आकारला जाईल व ही रक्कम सक्तीने वसूल करण्यात येईल अशी तंबीही अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आली आहे.
ही कारणे दाखवा नोटीस २० फेब्रुवारी २०२० रोजी जारी झाली असून ती अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला २ मार्च २० २० रोजी तामील झाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ मधील कलम ४८ (७) व (८), वर्धा जिल्हाधिकारी यांचा १२ फेब्रुवारी २०१८ रोजीचा आदेश आणि १२ जानेवारी २०१८ रोजीची शासन राजपत्र अधिसूचना यानुसार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध उत्खननाची ईटीएस मोजणी करण्यासाठी खनिकर्म अधिकाऱ्यांनी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. १५ जानेवारी २०२० रोजी आलेल्या ईटीएस मोजणी अहवालानुसार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने वर्धा जिल्ह्यातील मौजा चारमंडळ येथील २२१, मौजा गिरोली येथील १०१/२, १०२, मौजा कोटंबा येथील २०७/२, २०९, २१०, २११, मौजा इटाळा येथील ८, ९/१, ९/२, ९/३, ९/४, ९/५, ९/६, ११, १२ व मौजा गणेशपूर येथील ४४, ४५, ४६, ४७, ४८, ५७, ५८, व ६१ या खसरा क्रमांकाच्या जमिनीत अवैध उत्खनन करून ३ लाख ९ हजार ६८०.३६८ ब्रास मुरूम बाहेर काढला व समृद्धी महामार्गासाठी वापरला आहे.
५० हजारावर झाडे तोडली
अ‍ॅफकॉन्स कंपनीने अवैध उत्खननासाठी मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील ५० हजारावर झाडे तोडली, अशी माहिती कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी दिली. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सेलूचे वनक्षेत्रपाल यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार मौजा इटाळा येथील ३५ हजार तर, मौजा कोटंबा येथील १५ हजार २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच, मौजा महाबळा येथील २०० ते २५० फूट उंच टेकड्या झाडांसह भुईसपाट करण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायती व वर्धा खनिकर्म कार्यालयाने कंपनीला खोदकामाची परवानगी दिली नाही.

Web Title: Samrudhi Mahamarg; AfCons receives a penalty of Rs 244.64 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.