नव्या कोरोनाचा संशयित रुग्णांचे नमुने पुण्याला गेलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:07+5:302020-12-25T04:09:07+5:30
नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संबंधित युवकासह त्याच्या नातेवाईकाचे नमुने दुसऱ्या दिवशीही पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले नाही. हे ...

नव्या कोरोनाचा संशयित रुग्णांचे नमुने पुण्याला गेलेच नाही
नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संबंधित युवकासह त्याच्या नातेवाईकाचे नमुने दुसऱ्या दिवशीही पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले नाही. हे नमुने मेयोकडून शुक्रवारी पाठविले जाणार आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्टेन) आढळून आल्याने राज्यात खबरदारी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु मनपाचे या संदर्भातील युद्धपातळीवर नियोजन फसल्याचे दिसून येत आहे.
नंदनवन येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय हा युवक महिनाभरापूर्वी तो इंग्लंडला गेला होता. तो २९ नोव्हेंबरला नागपूरला परतला. लक्षणे नसल्याने त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. याचदरम्यान तो घरात न राहता बाहेर पडला. तसेच गोंदियालाही जाऊन आला. दरम्यान लक्षणे दिसू लागल्याने त्याने १५ डिसेंबर रोजी नंदनवन येथील आरोग्य केंद्रात रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट केले. यात तो पॉझिटिव्ह आला. दरम्यान मंगळवारी कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला गंभीरतेने घेत राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या कोविड नियंत्रण कक्षाला या युवकाची माहिती मिळाली. मनपाच्या पथकाने बुधवारी युवकाला मेडिकलच्या विशेष वॉर्डात भर्ती केले. त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असता तो निगेटिव्ह आला. परंतु त्याचे तीन नातेवाईक पॉझिटिव्ह आले. त्यांना लक्षणे नसल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूचा संशय असल्याने तीन नातेवाईकाचे नमुने मेडिकलने काढून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे बुधवारी हस्तांतरण केले. यामुळे ते तातडीने गुरुवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही ) त्याच्या स्ट्रेनचे स्वरुप शोधण्यासाठी पाठवणे आवश्यक होते. परंतु नमुने पाठविणार कोण, या प्रश्नावर संपूर्ण दिवस निघून गेला. अखेर हे नमुने पाठविण्याची जबाबदारी मेयोकडे देण्यात आली. शुक्रवारी हे नमुने विमानातून पुण्याला जाणार आहे. यामुळे अहवाल येण्यास आणखी एक दिवसाचा उशीर होणार आहे.
-त्या युवकाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह
रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या त्या युवकाची मेडिकलने बुधवारी आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात तो निगेटिव्ह आला. यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या अँटिजेन चाचणीच्या नमुन्यासह तीन नातेवाईकाचे नमुने पुण्याला पाठविले जाणार आहेत.