लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. तीनवेळा सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. औषधी व जीवनावश्यक वस्तूंचा घरोघरी पुरवठा केला जात आहे. परंतु या परिसरात आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करून नमूने घेण्याची गरज व्यक्त होत आहे.या भागात घरांच्या सर्वेचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. परंतु यात नागरिकांकडून फक्त माहिती विचारली जाते. अनेक नागरिक स्वत:हून आजाराची माहिती देत नाही. यात बाधित रुग्ण असल्यास परिसरातील इतर नागरिकांनाही धोका आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा, मोमिनपुरा, शांतिनगर व गिट्टीखदान गौतमनगर आदी भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करून या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्याला बंदी घालण्यात आली आहे. तीनवेळा अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी फवारणी करून हा भाग निर्जंतूक करण्यात आला आहे. रस्त्याची स्वच्छता केली जात असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. परंतु स्वच्छता व सर्वे करून भागणार नाही, तर घरोघरी आरोग्य विभागाच्या पथकामार्फत तपासणी करण्याची गरज आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरोग्य विभागातील (दवाखाने) अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. प्रतिबंधासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केल्याशिवाय बाधित रुग्णांची संख्या कळणार नाही.
नागपुरातील हॉटस्पॉट सतरंजीपुऱ्यात घरोघरी घ्यावे नमूने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:57 IST
कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करून नमूने घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
नागपुरातील हॉटस्पॉट सतरंजीपुऱ्यात घरोघरी घ्यावे नमूने
ठळक मुद्देपरिसरात दहशतीचे वातावरण : बाधित रुग्णांचा शोध घेण्याची गरज