हीच का ‘ओपन डोअर पॉलिसी’?

By Admin | Updated: July 3, 2015 03:00 IST2015-07-03T03:00:11+5:302015-07-03T03:00:11+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे स्पष्ट केले होते.

The same 'Open Door Policy'? | हीच का ‘ओपन डोअर पॉलिसी’?

हीच का ‘ओपन डोअर पॉलिसी’?

नागपूर विद्यापीठ : खेडेगावातील विद्यार्थिनीला कुलगुरूंनी आल्यापावली पाठविले परत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु काही आठवड्यातच त्यांची ‘ओपन डोअर पॉलिसी’ हरवत चालली असल्याचे दिसून येत आहे. चांगले गुण मिळवूनदेखील प्रवेश मिळत नसल्याची कैफियत घेऊन कुलगुरूंकडे आलेल्या एका विद्यार्थिनीला मदत करण्याऐवजी चक्क हाकलून लावण्यात आले.
व्यवस्थापन परिषदेची बैठक झाल्यानंतर एका विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कुलगुरूंकडे विविध मागण्या घेऊन पोहोचले होते. या मागण्यांवरून कुलगुरूंच्या कक्षाचे वातावरण तापले होते. यावेळी कुलगुरूंच्या कक्षाबाहेर तासाभरापासून एक नरखेड जवळील एका खेडेगावातील विद्यार्थिनी तिच्या वडिलांसह बसून होती. हे विद्यार्थी निघून गेल्यावर काहीच वेळात ते दोघेही कुलगुरूंच्या कक्षात आले. चांगले गुण मिळूनदेखील ‘बीएसस्सी’साठी प्रवेश मिळत नसल्याने आपणच मार्गदर्शन करावे, अशी आर्जव मुलीच्या वडिलांनी केली. काहीशा त्रासिक चेहऱ्यानेच कुलगुरूंनी सर्व ऐकून घेतले व काही क्षणातच त्यांचा पारा भडकला. त्यांच्याशी चांगल्याने दोन शब्दही न बोलता किंवा कुठलीही विचारपूस न करता कुलगुरूंनी ‘तुम्ही कुणाकडे आला आहात’ अशी विचारणा केली. ‘हा प्रश्न माझा नाहीच, अशा लहानसहान गोष्टींसाठी कुलगुरूंकडे येऊ नका.
प्राचार्यांकडे जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावा’ असे संतप्त स्वरात सुनावले. त्या मुलीची गुणपत्रिका, इतर कागदपत्रे इत्यादी काहीही न बघता दोघांनाही बाहेरचा दरवाजा दाखविला. यावेळी कुलगुरूंच्या कक्षात कुलसचिव, ‘बीसीयूडी’ संचालक, व्यवस्थापन परिषद सदस्यदेखील उपस्थित होते.

संतप्त प्रतिक्रिया
ही घटना विद्यार्थ्यांना समजताच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कार्य कुलगुरुंचे नसले तरी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन करणे त्यांना सहज शक्य होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपले दरवाजे सदैव उघडे राहतील, असा दावा अंतर्गत राजकारणामुळे हवेतच विरला असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा होती. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: The same 'Open Door Policy'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.