मनपाची परवानगी न घेता तोडले समाजभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 23:51 IST2021-06-09T23:50:35+5:302021-06-09T23:51:42+5:30
Samaj Bhavan demolished डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी मनपाची परवानगी न घेता सांस्कृतिक भवन तोडण्यात आले.

मनपाची परवानगी न घेता तोडले समाजभवन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी परिसराचा विकास व पर्यटनाला चालना मिळावी. यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये अंबाझरी येथील ४२.४२ एकर जमीन एमटीडीसीला देण्यात आली होती. यातील १९.८४ एकर जमीन महापालिकेची होती. मनपा सभागृहाच्या मंजुरीनंतर ही जमीन एमटीडीला देण्यात आली. येथील ४५०० चौ. फूट जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी मनपाची परवानगी न घेता सांस्कृतिक भवन तोडण्यात आले.
भवन तोडण्यामागे एमटीडीसीच्या माध्यमातून सरकारचा थेट संबंध आहे. सापत्न वागणुकीतून सांस्कृतिक भवन तोडण्यात आल्याचा आरोप मनपातील सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे व विधी समितीचे माजी सभापती धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
हा बौद्ध समाज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या आस्थेचा हा विषय असल्याने सांस्कृतिक भवन पुन्हा उभारण्यात यावे, अशी मागणी केली. यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी ११ जूनला येथे पाहणी करतील. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याची जबाबदारी झोनच्या सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.