सलून व्यावसायिकांनी केली शासन निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:22+5:302021-04-09T04:08:22+5:30
नागपूर : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांअंतर्गत ३० एप्रिलपर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले ...

सलून व्यावसायिकांनी केली शासन निर्णयाची होळी
नागपूर : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांअंतर्गत ३० एप्रिलपर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने व्यावसायिकांचा विचार न करता निर्बंध लादल्याचा सलून व्यावसायिकांचा आरोप आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुढाकारात नागपूर शहरासह जिल्ह्यातील सलून व्यावसायिकांनी दुकानांसमोर निदर्शने करून शासनाच्या आदेशाची होळी केली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या आवाहनानुसार, महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी यांच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. जिल्हास्तरावर या निर्णयाचा निषेध करून दुकानदारांनी आदेशाची होळी केली. शासनाने आपला आदेश मागे न घेतल्यास अधिक तीव्र स्वरूपात निदर्शने करण्याचा व गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नागपूर शहरासह रामटेक, कुही, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर, मौदा, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण आदी तालुक्यांमध्ये आंदोलन व निदर्शने करण्यात आली.