सलमान अल्ताफमध्ये होती तीन महिन्यांपासून खुन्नस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:45+5:302021-02-05T04:48:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात सलमान आणि अल्ताफ यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून खुन्नस होती. दोघेही कुख्यात गुंड ...

सलमान अल्ताफमध्ये होती तीन महिन्यांपासून खुन्नस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात सलमान आणि अल्ताफ यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून खुन्नस होती. दोघेही कुख्यात गुंड असल्याने त्यांना एकमेकांपासून धोका वाटत होता. या असुरक्षिततेच्या भावनेतूनच कुख्यात सलमान खान समशेर खान पठाण (वय २५) याने अल्ताफ शेख अशफाक शेख (वय २७) याची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सलमानला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने ६ दिवसांचा पीसीआर मंजूर केला.
आरोपी सलमान खानचा बाप समशेर हा नागपुरातील कुख्यात गुंडाच्या टोळीचा म्होरक्या असून दोन दशकांपूर्वी त्याची नागपूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावांतही प्रचंड दहशत होती. खुनी हल्ले, हाणामाऱ्या, खंडणी वसुली हाच त्याचा मुख्य धंदा होता. लहानपणापासूनच सलमानने हे सर्व पाहिल्यामुळे तो किशोरवयातच गुन्हेगारीत सक्रिय झाला. अल्पवयीन असतानाच त्याने एकाच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे समशेरची दहशत कमी झाली असताना त्याने गुन्हेगारी वर्तुळात आपली ओळख तयार केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारी आणि एमपीडीएची कारवाईसुद्धा केली होती. गेल्या वर्षीच तो कारागृहातून बाहेर आला. त्याचे सासर कळमन्यात होते. त्यामुळे तो नेहमी तिकडे जायचा. कळमन्याच्या प्रकाशनगरातच अल्ताफ राहत होता. तोसुद्धा कुख्यात गुंड होता. तीन महिन्यांपूर्वी अल्ताफ आणि सलमानमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच खटके उडू लागले. ते दोघेही खुन्नस ठेवून होते. दोघांचीही वृत्ती एकमेकांना माहीत असल्याने त्यांना परस्परापासून धोका वाटत होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास सलमान बाळंत झालेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागण्यासाठी वडील समशेरकडे आला. तेथून तो परत जात असताना शेषनगरात एका इमारतीजवळ सलमानला अल्ताफ दिसला. नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर सलमानने चाकू काढून अल्ताफवर सपासप घाव घातले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेला. नंदनवन पोलिसांनी रात्री त्याला अटक केली. अल्ताफकडून धोका वाटत असल्याने त्याचा गेम केल्याची माहिती सलमानने पोलिसांना दिली आहे.
---
नवीन ठाणेदाराला गुन्हेगारांचे आव्हान
नंदनवनचे ठाणेदार सांदिपान पवार यांची दोन दिवसांपूर्वीच क्राईममध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर गुन्हे शाखेचे किशोर पर्वते यांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र, पर्वते यांनी व्यक्तिगत कारणामुळे ठाणेदार म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी येथे मुख्तार शेख यांची नियुक्ती केली आहे. शेख यांनी पदभार सांभाळण्यापूर्वीच ही घटना घडली. मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर शेख यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून त्याचा ६ दिवसांचा पीसीआर मिळवला. नंदनवनमध्ये अनेक कुख्यात गुंड आहेत. त्यांचे आव्हान नवीन ठाणेदारासमोर आहे.
----