कर वसुलीसाठी स्टार बसची विक्री

By Admin | Updated: August 23, 2015 03:09 IST2015-08-23T03:09:09+5:302015-08-23T03:09:09+5:30

वंश निमयकडे बालक पालनपोषण कर, प्रवासी कर व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकीत आहे.

Sales of Star Bus for tax collection | कर वसुलीसाठी स्टार बसची विक्री

कर वसुलीसाठी स्टार बसची विक्री

आरटीओ गंभीर : पुन्हा सहा बसेस जप्त
नागपूर : वंश निमयकडे बालक पालनपोषण कर, प्रवासी कर व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकीत आहे. हा कर भरावा म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने शनिवारी पुन्हा सहा बसेस जप्त केल्या. आतापर्यंत आरटीओने ९८ बसेस जप्त केल्या आहेत. परिणामी, शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. विशेष म्हणजे, महिना होऊनही जप्त करण्यात आलेल्या बसेस थकीत कर भरून सोडविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आरटीओ प्रशासन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार या बसेसची विक्री करून कर वसूल करण्याचा विचारात आहे.
वंश निमयने २००७ पासून प्रवासी कराचा एकही रुपया भरलेला नाही. २०१३ पासून वाहन करही भरलेला नाही. हे दोन्ही कर व पालनपोषण कर मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये वंश निमयकडे थकीत आहे. कराची ही रक्कम वंश निमयने प्रवाशांकडून वसूल केली आहे. परंतु थकीत रक्कम भरण्यास मुदतीवर मुदत देऊनही टाळटाळ करीत आहे. याची गंभीर दखल घेत आरटीओने २ आॅगस्ट रोजी ६३, १० आॅगस्ट रोजी १६, १७ आॅगस्ट रोजी १३ तर शनिवारी ६ बसेस जप्त केल्या. सध्या आरटीओ कार्यालयात बसेस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. यातच महिना होऊही वंश निमयने थकीत कर भरून जप्त बसेस सोडविलेल्या नाहीत. याची गंभीर दखल आरटीओ प्रशासनाने घेतली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री करून कर वसूल केला जाऊ शकतो. त्यानुसार आरटीओने या संदर्भात विचार सुरू केला आहे. असे झाल्यास महिन्याभराच्या कालावधीत बस विक्रीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एका बसच्या विक्रीतून आरटीओला पाच लाख मिळू शकतात. परंतु जाणकारांच्या मते ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वंश निमय थकीत कर भरण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
आरटीओवर दबाव
चौथा शनिवार, सुटीचा दिवस असतानाही आरटीओ शहर कार्यालयाच्या वायुपथकाने स्टार बसवर जप्तीची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कारवाई थांबविण्यासाठी आरटीओवर दबाव आणण्यात आला. नियमानुसार आरटीओ, शहर कार्यालय आपले कर्तव्य बजावत आहे, मात्र या दबावतंत्रामुळे कारवाई थांबविली जाते की सुरू राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sales of Star Bus for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.