सलीम मलिकच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: November 13, 2015 02:48 IST2015-11-13T02:48:44+5:302015-11-13T02:48:44+5:30
दहशतवादी कारवायाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर रहेमान याच्या पोलीस

सलीम मलिकच्या पोलीस कोठडीत वाढ
अवकाशकालीन न्यायालय :दहशतवादी कारवाई
नागपूर : दहशतवादी कारवायाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर रहेमान याच्या पोलीस कोठडीत विशेष अवकाशकालीन न्यायालयाचे न्यायाधीश जे.आर. घाडगे यांच्या न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.
सलीम मलिक याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) १ नोव्हेंबर २०१५ रोजी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १५, १६ आणि १८ अन्वये अटक केली होती. त्याला त्यावेळी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपताच गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
प्रकरण असे की, २५ सप्टेंबर २०१५ रोजी ईदनिमित्त मेंढिया मशीदमध्ये नमाज आयोजित करण्यात आले होते. नमाज संपल्यानंतर अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक याने बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला केला होता. गाय आणि बैलांच्या कत्तलींवर बंदी आणली, असे तो म्हणत होता. हल्ल्यात तीन पोलीस जवान जखमी झाले होते.
याप्रकरणी अब्दुल मलिक याच्याविरुद्ध भादंविच्या ३०७, ३३२, ३३३, १५३, ३५३, १८६, भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम १५, १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चौकशीत अब्दुल मलिक याने सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजीबूर याने जिहादसंदर्भात व्हिडिओ सीडी आणि साहित्य दाखविल्याची बाब पोलिसांना सांगितली होती. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सलीम मलिक याला हजर करून न्यायालयाला वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना असे सांगितले की, आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपीच्या घरून ६० सीडी आणि उर्दू भाषेतील पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी काही आक्षेपार्ह आहेत. आरोपीचे मोबाईल परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोपीच्या वतीने न्यायालयात हजर झालेले अॅड. मीर नगमान अली यांनी वाढीव पोलीस कोठडीस विरोध केला. आरोपी हा एका विशिष्ट समुदायातील असल्याने पोलिसांवरील साध्या हल्ल्याच्या घटनेला दहशतवादी कारवायाचे स्वरूप देण्यात आले, जप्त सीडी आणि उर्दू भाषेतील साहित्यात जिहादबाबत कोणताही उल्लेख नाही, असेही अॅड. अली म्हणाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली. (प्रतिनिधी)