विनापरवाना बियाणे विक्री
By Admin | Updated: June 18, 2016 02:21 IST2016-06-18T02:21:56+5:302016-06-18T02:21:56+5:30
जिल्ह्यात हैदराबाद येथील एक बियाणे उत्पादक कंपनी विनापरवाना धान बियाण्यांची सर्रास विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विनापरवाना बियाणे विक्री
हैदराबाद येथील कंपनीचा प्रताप : कृषी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद
जीवन रामावत नागपूर
जिल्ह्यात हैदराबाद येथील एक बियाणे उत्पादक कंपनी विनापरवाना धान बियाण्यांची सर्रास विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मे. सोनम सिड्स अॅण्ड टेक्नालॉजी असे त्या कंपनीचे नाव आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालयाने या कंपनीला महाराष्ट्रात धान बियाण्याचे १४ वाण विक्रीस परवानगी दिली आहे. त्यात सोना राजा, सोनम-२०१, सोनम ३०६, बलवान (डीआरके), एमटीयू-१०१०, आयआर-६४, जेजीएल-१७९८, जेजीएल-३८४, बीपीटी-५२०४, एमटीयू - १००१, डब्ल्यूजीएल-१४ व एचएमटी-सोना या वाणांचा समावेश आहे. मात्र ही कंपनी या सर्व वाणांसह ‘सोना राजा गोल्ड’ या विनापरवाना धान बियाण्याची सुद्धा विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे.
विशेष म्हणजे, रामटेक तालुक्यात या बियाण्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून, त्यासंबंधी ‘लोकमत’ कडे काही कृषी सेवा केंद्रांचे विक्री बिल प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे या घटनेने कृषी यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वास्तविक कृषी विभागाने महिनाभरापूर्वीच अशा बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागात कृषी अधिकाऱ्यांची ७० पथके सज्ज केली आहेत. त्यांचा गवगवा सुद्धा केला आहे. मात्र या प्रकरणावरून ती सर्व पथके केवळ नावापुरती असल्याचे सिद्ध होत आहे. संबंधित कंपनीला जिल्ह्याचे परवाना अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी जिल्ह्यात बियाणे विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर वॉच ठेवण्याची प्रथम जबाबदारी सुद्धा त्यांची आहे. मात्र असे असताना, मोहरील यांना ‘सोना राजा गोल्ड’ या बियाण्याच्या विक्रीसंबंधी विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ‘लोकमत’ कडे पुरावा उपलब्ध असल्याचे सांगताच त्यांनी बाजू सावरली. माहिती सूत्रानुसार काही वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच ही विक्री सुरू असल्याचे सांगितले जात आहे.