२२ हजार शिक्षकांचे पगार अडले
By Admin | Updated: September 21, 2015 03:07 IST2015-09-21T03:07:26+5:302015-09-21T03:07:26+5:30
आॅनलाईन वेतन प्रक्रिया शिक्षकांसाठी डोकेदु:खी ठरत आहे.

२२ हजार शिक्षकांचे पगार अडले
आॅनलाईनचा फटका : शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
नागपूर : आॅनलाईन वेतन प्रक्रिया शिक्षकांसाठी डोकेदु:खी ठरत आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनाचे आॅनलाईन देयके स्विकारण्यासाठी टीसीएस कंपनीकडून वेबसाईट बनविली होती. गेल्या काही दिवसापासून ही वेबसाईट हँग असल्यामुळे आॅनलाईन वेतन देयके स्वीकारण्याचे काम रखडले आहे. शासनाने या कंपनीचे पैसेच भरले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२४२ शाळेतील २२ हजार शिक्षकांचे वेतन अडले आहे. यात १७ हजार हायस्कूल व ५ हजार प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे आॅनलाईन प्रक्रिया वारंवार बंद पडत असल्याने कुठलेच काम पूर्णत्वास जात नाही. सध्या संचमान्यता, सरल, वेतनाची बिले आॅनलाईन सबमिट करायची आहेत. या कामात कधी सॉफ्टवेअर हँग होत आहे तर कधी तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.
शिक्षकांमध्ये सध्या सरलच्या कामाची चर्चा चांगलीच रंगत आहे. राज्यभरात हे काम करायचे होते. मात्र वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने शिक्षण विभागाने प्रत्येक विभागाला ठराविक कालावधी दिला होता. या कालावधीतही वेबसाईट सुरू झाली नाही. त्यामुळे सरलचे काम रखडले होते. आता १७ ते २१ सप्टेंबर हा कालावधी नागपूर विभागाला दिला आहे.
१७ सप्टेंबरला सकाळी वेबसाईट सुरू झाली. दुपारी परत बंद झाली. त्यानंतर १८ सप्टेंबरला सायंकाळी वेबसाईट सुरू झाली. दोन दिवस कुठलेही काम न झाल्याने २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सध्या वेबसाईट सुरू असली तरी सणांचे दिवस असल्याने शिक्षक सुट्ट्यांवर आहेत, त्यामुळे काम खोळंबले आहे. सर्व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना २०१४-१५ ची संचमान्यता करायची आहे. सध्या ज्युनिअर कॉलेजची संचमान्यता आॅनलाईन करणे सुरू आहे. त्यातही तांत्रिक त्रुटी येत असल्याने जवळपास ४५ टक्के काम अपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी
शाळा व महाविद्यालयांनी २०१४-१५ ची शिक्षण उपसंचालकांच्या सहीची संचमान्यतेची प्रत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेतन देयकासोबत जोडणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय वेतन देयके स्वीकारू नये, असे आदेश दिले आहे. परंतु शिक्षण उपसंचालकाने संचमान्यता पूर्ण केलेल्या महाविद्यालयांना अद्यापही संचमान्यतेची प्रत दिलेली नाही. शिक्षण अधीक्षकांनी संचमान्यतेची प्रत न मिळाल्यामुळे वेतनाचे बिल परत केले आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईनमुळे सर्वत्र गोंधळ
एकाच वेळेला सर्व आॅनलाईन काम आल्यामुळे शिक्षकांमध्ये सर्वत्र गोंधळाची अवस्था आहे. वारंवार हँग होत असलेली वेबसाईट, संचमान्यतेच्या अडचणी, आॅनलाईन प्रणालीत वारंवार होत असलेला बिघाड यामुळे आॅनलाईन प्रक्रिया डोकेदुखी झाली आहे. वेतन वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शिक्षण विभागाने सरल व शालार्थच्या आॅनलाईन प्रणालीत ताबडतोब सुधारणा करून, सुरळीत करावे, अन्यथा शिक्षकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
दिलीप तडस, विभागीय कार्यवाह, शिक्षक भारती