गडरलाईनमुळे साईनगर, न्यू ओमनगरवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST2021-02-16T04:08:48+5:302021-02-16T04:08:48+5:30
नागपूर : नागपूर शहरात मोठमोठ्या स्कीममध्ये नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहराचा झपाट्याने कायापालट होत आहे. ...

गडरलाईनमुळे साईनगर, न्यू ओमनगरवासी त्रस्त
नागपूर : नागपूर शहरात मोठमोठ्या स्कीममध्ये नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शहराचा झपाट्याने कायापालट होत आहे. परंतु हुडकेश्वर परिसरातील साईनगर २ आणि न्यू ओमनगर या वस्तीतील नागरिकांना मात्र अद्यापही मूलभूत सुविधांसाठी लढा द्यावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून नागरिक आपल्या मागण्यांसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
गडरलाईन नसल्यामुळे पसरते दुर्गंधी
न्यू ओमनगर या वस्तीत गडरलाईनची सुविधा नाही. त्यामुळे सेफ्टी टँकचे पाणी परिसरातील विहिरीत झिरपत असून विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सर्वात जुने ले-आऊट आहे. परंतु महापालिकेने अद्यापही या ले-आऊटमध्ये गडरलाईनची व्यवस्था करून दिलेली नाही. यामुळे वस्तीत दुर्गंधी पसरत असून वस्तीत उभे राहणेही शक्य होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सेफ्टी टँक भरल्यास दोन हजार रुपये देऊन काॅर्पोरेशनची गाडी बोलवावी लागते. विनाकारण पैशाचा भुर्दंड बसत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची मागणी होत आहे.
चेन स्नॅचिंगच्या घटनात वाढ
न्यू ओमनगर भागात चेन स्नॅचिंगच्या घटनात वाढ होत आहे. या भागात स्पीडब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक महिलांच्या गळ्यातील चेन ओढून सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे. तसेच या भागात पोलिसांनी नियमित गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात गार्डनसाठी जागा सोडण्यात आली आहे. परंतु गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. गार्डनमध्ये खेळण्याची व्यवस्था नसल्यामुळे मुले रस्त्यावर खेळतात. या भागात सिमेंट रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. या भागात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे नागरिक रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
साईनगरात पांदण रस्त्यावर साचते पाणी
साईनगर २ मध्ये पांदण रस्ता आहे. परंतु हा पांदण रस्ता खचलेला आहे. या रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे तेथे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होतो. या पांदण रस्त्याची लेव्हलिंग केल्यास नागरिकांनी तिथे झाडे लावण्याचा विचार व्यक्त केला. साईनगर २ मध्ये सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे नागरिक जिथे जागा मिळेल तिथे कचरा टाकतात. या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात बाजूला असलेल्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या नाल्यावर सुरक्षा भिंत उभारण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागात डासांचा प्रादुर्भाव होत असून महापालिकेने या भागात फवारणी करण्याची गरज आहे.
गडरलाईनची व्यवस्था करावी
‘न्यू ओमनगरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सेफ्टी टँक भरल्यानंतर घाण पाणी रस्त्यावर वाहते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून महानगरपालिकेने या भागात गडरलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे.’
- भूषण निळे, नागरिक
स्पीडब्रेकर बसविण्याची गरज
‘रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता राहते. याशिवाय या भागात चेन स्नॅचिंगच्या घटनात वाढ झाली आहे. या भागात स्पीडब्रेकर बसविणे आवश्यक आहे.’
-सुभाष भगत, नागरिक
गार्डनचा विकास व्हावा
‘गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. तसेच ग्रीन जीम नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महानगरपालिकेने गार्डनचा विकास करण्याची नागरिकांची मागणी आहे.’
- प्रणय पेठे, नागरिक
पांदण रस्त्याची लेव्हलिंग करावी
‘पांदण रस्ता खचल्यामुळे त्यात पाणी साचते. या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पांदण रस्त्याची लेव्हलिंग करून नागरिकांना दिलासा द्यावा.’
- शारदा वाघमारे, महिला
सफाई कर्मचारी नियमित यावेत
‘साईनगर २ परिसरात सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे कचरा साचून राहतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. सफाई कर्मचारी नियमित आल्यास या भागात स्वच्छता राखण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिकेने या भागात सफाई कर्मचारी नियमित पाठविण्याची गरज आहे.’
- सुनिता लाडेकर, महिला
नाल्यावर सुरक्षा भिंत उभारावी
‘नाल्यावर सुरक्षा भिंत नसल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर साचून साप निघतात. त्यामुळे नाल्यावर सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे.’
- शारदा भानारकर, महिला
रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई व्हावी
‘परिसरात अनेक नागरिकांनी प्लॉट घेतलेले आहेत. परंतु तेथे बांधकाम केलेले नसल्यामुळे या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन दुर्गंधी पसरते. त्यामुळे या रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी आहे.’
- अशोक मस्के, नागरिक
गडरलाईनमुळे पसरते दुर्गंधी
या भागात ताजेश्वरनगरकडून आलेली गडरलाईन फुटलेली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या फुटलेल्या गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना होत असलेला त्रास दूर करण्याची नागरिकांची मागणी आहे.’
- मनोज मोरे, नागरिक
................