नंदा खरे यांना ‘उद्या’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:47+5:302021-03-13T04:13:47+5:30
नंदा खरे यांना ‘उद्या’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार - मात्र स्वीकारण्यास कळवला नकार - आबा महाजन यांना ‘बाल साहित्य ...

नंदा खरे यांना ‘उद्या’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
नंदा खरे यांना ‘उद्या’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
- मात्र स्वीकारण्यास कळवला नकार
- आबा महाजन यांना ‘बाल साहित्य पुरस्कार’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध कादंबरीकार नंदा खरे उपाख्य अनंत यशवंत खरे यांना त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. यासोबतच जळगावचे प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीने ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर केला आहे.
तथापि, खरे यांनी साहित्य अकादमीचा हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार कळवला आहे. गेल्या चार वर्षांपासून आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही व या पुरस्काराबाबतही आपण त्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नंदा खरे पेशाने स्थापत्य अभियंते असून, धरणे, पूल, कारखाना बांधणाऱ्या खरे ॲण्ड तारकुंडे या कंत्राटदार कंपनीचे ते भागीदार व व्यवस्थापकीय संचालक होते. ३४-३५ वर्षे या व्यवसायात काम केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि नंतरचा काळ लिखाणासाठी वाहून घेतला. त्यांच्या ‘संप्रति, विसशे पन्नास, अंताजीची बखर, कापूसकोंड्याची गोष्ट, कहाणी मानवप्राण्याची’ आदी साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. सोबतच त्यांनी विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. भाषांतर, ललित लेखनही केले आहे.
खरे यांची ‘उद्या’ ही कादंबरी जानेवारी २०१४मध्ये पुण्याच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली. या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृती म्हणून २०२० सालचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला असून, एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार कळवला आहे. त्यांच्या या निर्णयाने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जळगावचे बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये रोख, ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
----------
चार वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे. मात्र, यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे.
- नंदा खरे, कादंबरीकार