महिला-मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:03+5:30

महिला मुलींच्या सुरक्षेला शहर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

Safety of women and girls is the highest priority | महिला-मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

महिला-मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

Next
ठळक मुद्देलोकमतच्या धाडसी उपक्रमाचे कौतुक, रस्त्यारस्त्यावर पोलिसांचे गस्तीपथक

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्ली, हैदराबादसारख्या भयावह घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागपूर पोलीस कसोशीचे प्रयत्न करीत आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री बाहेर असलेल्या, बाहेरगावाहून परतणाऱ्या महिला-मुलींना आश्वस्त करण्यासाठी आणखी काही उपाययोजना पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रस्त्यारस्त्यावर रात्रंदिवस पोलिसांचे गस्तीपथक फिरत आहेत. त्यामुळे कोणत्याही महिला - मुलीने घाबरण्याचे कारण नाही. महिला मुलींच्या सुरक्षेला शहर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. हैदराबादच्या घटनेनंतर देशभरातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. खास करून महिला-मुलींमधील अस्वस्थता अधिकच तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे हृदयस्थळ असलेल्या उपराजधानीत पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय प्रयत्न केले किंवा दिल्ली, हैदराबादसारख्या भयावह घटना टाळण्यासाठी पोलिसांची काय तयारी आहे, या संबंधाने पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही ग्वाही दिली.
विशेष म्हणजे, निर्भया प्रकरणाने देशात खळबळ उडवून दिली असताना आणि या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप शिक्षा मिळाली नसतानाच हैदराबादमधील दिशावर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला जाळून ठार मारले. या घटनेमुळे महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा देशभर चर्चेला आला. रात्री महिला-मुलींनी घराबाहेर पडूच नये का, असाही अस्वस्थ प्रश्न महिला-मुलींकडून उपस्थित झाला आहे. एकीकडे सर्वत्र हे वातावरण असताना नागपुरात मात्र तरुणाईचा दुसराही एक लज्जास्पद पैलू रोज रात्री बघायला मिळतो.
भर रस्त्यावर तरुणांच्या घोळक्यात एक-दोन तरुणी उभ्या दिसतात. त्या रस्त्यावरच मद्याचे पेग रिचवतात, सिगारेटचे झुरके लावतात. त्यांच्यासोबतच्या तरुणाला आलिंगन देतात, त्याचे सिनेस्टाईल चुंबन घेतात. सिनेमातील दृश्यांनाही लाज वाटायला भाग पाडणारे हे चित्र मध्यरात्रीनंतर उपराजधानीत सर्रास बघायला मिळते. सैराट सुटलेल्या या तरुण-तरुणींच्या निर्लज्जपणाचा सचित्र वृत्तांत लोकमतने मंगळवारी १० तसेच बुधवारी ११ डिसेंबरला प्रकाशित केला. निर्ढावलेल्या या तरुणांना कोण हटकणार, अशा भूमिकेत असलेल्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवरांनी लोकमतच्या या धाडसी तसेच अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाºया प्रकाराचे स्वागत करून यांना ‘आवर घाला’ असा सूर आळवला.
या निर्लज्ज मंडळींना आवरा अन्यथा त्यांच्या कुकृत्याची समाजकंटक क्लीप तयार करेल, त्यांना ब्लॅकमेल करेल किंवा टून्न असलेल्यांवर समाजकंटकांची नजर पडली तर दिल्लीतील निर्भया, हैदराबादमधील प्रकरणांची पुनरावृत्ती नागपुरातही होईल, अशी भीतीही वर्तविली गेली. या संबंधानेही पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
भरोसा सेलला आदेश
स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून लक्षवेध केल्याबद्दल डॉ. उपाध्याय यांनी लोकमतचे कौतूक केले. या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकार रोखण्यासाठी भरोसा सेलला आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, चार दामिनी पथके सज्ज करण्यात आली. एका पथकात चार महिला पोलीस अन् पाचवा वाहनचालक असेल. ही पथके दिवसा उद्यान आणि रात्रीच्या वेळी रस्त्यारस्त्यावर फिरतील. तरुणांच्या घोळक्यात किंवा संशयास्पद अवस्थेत दिसणाºया महिला-मुलींची चौकशी करतील. गरज पडल्यास त्यांच्या पालकांना बोलवून घेतले जाईल. त्यानंतर त्यांच्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
पुरुष कर्मचाऱ्यांना दूरच ठेवणार
निर्ढावलेल्या तरुणी अन् तिचे मित्र अनेकदा हटकणाºया पोलिसांवरच हावी होतात. बाचाबाची नंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात. नव्हे, कंट्रोल रूमला फोन करून किंवा नजिकच्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. या बाबींकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता, त्यांनी हा धोका अधोरेखित केला. तो टाळण्यासाठी पुरुष पोलीस दूरच राहतील. महिला पोलीसच त्यांना हाताळतील. त्यांची चौकशी करतील, असे स्पष्ट केले.

Web Title: Safety of women and girls is the highest priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.