Safe out sickle pierced in the head: Life for a woman | डोक्यात खोल रुतलेला विळा सुरक्षित बाहेर : महिलेला जीवनदान
डोक्यात खोल रुतलेला विळा सुरक्षित बाहेर : महिलेला जीवनदान

ठळक मुद्देमेडिकलच्या ट्रॉमात यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जोरदार वार केल्यामुळे एका ६५ वर्षीय महिलेच्या डोक्यात खोलवर रुतलेला विळा यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील ट्रॉमा सेंटरमध्ये गुरुवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे महिलेला जीवनदान मिळाले.
मीराबाई असे महिलेचे नाव असून त्या आसोली (पुसद, जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहेत. अत्यंत गरीब असलेल्या मीराबाई रात्री घरात झोपलेल्या असताना अज्ञात इसमाने त्यांच्यावर विळ्याने जोरदार वार केला. तो विळा मीराबाईचा उजवा डोळा फोडून डोक्यात खोल रु तला. त्यानंतर त्यांना लगेच मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मीराबाईची अवस्था पाहून ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टर्स व परिचारिकांनी वेगात हालचाली केल्या. केवळ दीड तासामध्ये सर्व तपासण्या पूर्ण करून मीराबाईला शस्त्रक्रिया कक्षात हलविण्यात आले. त्यानंतर न्यूरोट्रॉमा विभाग प्रमुख डॉ. पवित्र पटनाईक यांच्या नेतृत्वातील चमूने अवघ्या एक तासात डोक्यात रुतलेला विळा सुरक्षितपणे बाहेर काढला. त्यानंतर फुटलेला डोळा बाहेर काढणे, जखम शिवणे यासह इतर आवश्यक उपचार करण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे मीराबाईला नवीन जीवन मिळाले.
शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या चमूत न्यूरोसर्जन डॉ. अंकुर संघवी, डॉ. रामानुज काबरा, डॉ. पलक जयस्वाल, अ‍ॅनेस्थिया तज्ज्ञ डॉ. ढोमणे, डॉ. सोमा चाम, डॉ. वैद्य, डॉ. विशाखा, डॉ. नेहा, डॉ. हर्ष, आॅफथॅलमॉलॉजिस्ट डॉ. दिव्यांजना, डॉ. शीतल, मॅक्सिल्लोफेशियल सर्जन डॉ. विकास मेश्राम, निवासी डॉक्टर शुभम, रोशन, मकरंद, परिचारिका प्रणिता, स्वाती, रेडिओलॉजिस्ट शिवकुमार राठोड, जवाहर राठोड यांचा समावेश होता.

मेंदूला धोका होता
ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट स्वरुपाची होती. या शस्त्रक्रियेमुळे मीराबाईच्या जीवाला धोका होता. विळा बाहेर काढताना मेंदूला कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही याची काळजी घेणे हे मोठे आव्हान होते. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. मीराबाईला नवीन जीवन मिळाले याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.
 डॉ. पवित्र पटनाईक

Web Title: Safe out sickle pierced in the head: Life for a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.