वॉर्ड हस्तांरणाच्या विरोधात : ग्रामस्थांचा मोर्चा
रामटेक : रामटेक शहरालगत असलेल्या सोनेघाट ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर, पिपरिया पेठ, कवडक टेकडी, दुधाळा व मौजा माकडेवाडी या वाॅर्डात राहणाऱ्या नागरिकांकडून ग्रामपंचायतने कर वसूल करू नये, असा आदेश नगरपालिकेने ग्रा.पं. प्रशासनाला दिला आहे. या आदेशाविरुद्ध मंंगळवारी सोनेघाट ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी मोर्चा काढत नगरपालिकेवर धडक दिली. यासंदर्भात नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांना निवेदन देण्यात आले. रामटेक नगरपालिकेचा सुधारित विकास आराखडा १९९३ ला राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यानंतर सर्व प्रक्रिया ६ ऑक्टोबर २००१ ला नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी मुख्य कार्यालय नगर रचना विभाग, पुणे यांनी मंजुरीही दिली. नगर रचना विभाग, नागपूर व तत्कालीन अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनीही स्वीकृती प्रदान केली. पण पुढे ती गावे महसूल विभागाने ग्रामपंचायतमधून वगळून रामटेकला जोडणे आवश्यक होते. पण २० वर्षे याकडे महसूल विभाग व नगरपालिकेने दुर्लक्ष केले. न.प. सदस्य दामोदर धोपटे यांनी नगरपालिकेला याबाबत अवगत केले. त्यामुळे न.प.ने एक पत्र सोनेघाट ग्रामपंचायतला पाठवीत कर वसूली करू नये असे सांगितले. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. सोनेघाट ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांनी न.प.च्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. मोर्चात सोनेघाट ग्रामपंचायतच्या सरपंच अर्पणा वासनिक, उपसरपंच नीलकंठ महाजन, काँग्रेसचे सचिन किरपान, नितीन भैसारे, देवा मेहरकुळे, गणेश बावनकुळे, बबलू दुधबर्वे, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी झाले होते.
२० वर्षांपूर्वीचा हा विकास आराखडा आहे. पूर्वी येथे वस्ती नव्हती. तुरळक घरे होती. त्यामुळे कुणी लक्ष दिले नाही. आता दाट वस्ती झाली आहे. शासनाच्या मंजूर आराखड्यानुसार नगरपालिकेने पत्र दिले आहे. याबाबत शासनाचे जे काही आदेश असतील त्याप्रमाणे न्याय देण्यात येईल.
- दिलीप देशमुख, नगराध्यक्ष, रामटेक