Sadness is the beauty of ugly pictures | विषण्णता हेच कुरूप चित्रांचे सौंदर्य

विषण्णता हेच कुरूप चित्रांचे सौंदर्य

ठळक मुद्देसर्जना निर्माणमध्ये ‘विरुपतेच्या तळातील सौंदर्य’वर व्याख्यान

ऑनलाईन लोकमत
नागपूर : काही चित्र बघायला कुरुप असली तर त्यातील आशय हा मनाला चटका लावणारा असतो. कारागृहात मरणावस्थेत पडलेल्या पित्याला दूध पाजणारी मुलगी असो की बुडत्या जहाजात जगण्याचा आकांत करणाऱ्या प्रवाशांचे चित्र असो, हे चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघातर्फे ‘सर्जना निर्माण’ या उपक्रमांतर्गत शनिवारी ‘विरुपतेच्या तळातील सौंदर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी नाट्यकर्मी डॉ. पराग घोंगे यांनी चित्रकार मेरीला यांचे पित्याला स्तनपान करविणाऱ्या मुलीचे ‘रोमन चॅरिटी’ व सॅल्वाडोर डाली यांचे ‘येलो क्राईस्ट’ या चित्रांवर भाष्य केले तर चंद्रकांत चन्ने यांनी अबनिंद्रनाथ टागोर यांचे ‘एन्ड ऑफ जर्नी’ व जेरीकॉल्टचे ‘रॉफ्ट ऑफ मेडूसा’ या चित्रांवर भाष्य केले. डॉ. पराग घोंगे यांनी रोमन चॅरिटी व येलो क्राईस्ट या चित्रातील सौंदर्याचे भावस्पर्शी वर्णन केले. सिमोन या व्यक्तीला रोमन राजा कारागृहात बंदिस्त करतो व मृत्यूची शिक्षा सुनावून अन्नपाणी बंद करतो. अशावेळी त्यांची मुलगी पेरो पित्याला दररोज भेटण्याची परवानगी मागते व कारागृहात त्याचे स्तनपान करून त्यास जगविण्याचा अगतिक प्रयत्न करते. या चित्रात अश्लीलता जाणवत नाही तर त्यातील क्रूरता, पिता-पुत्रीची अगतिकता मनाला चटका लावते. प्रभू येशूला अवकाशात क्रू सावर चढविण्याचे चित्रही असेच मनाला चटका लावणारे असल्याचे डॉ. घोंगे यांनी सांगितले.
चंद्रकांत चन्ने यांनी रॉफ्ट ऑफ मेडूसा या चित्राचे वर्णन केले. फ्रेन्च चित्रकार जेरीकॉल्ट याने १८८६ साली हे चित्र रेखाटले होते. पाहणाऱ्यांना हादरविणाऱ्या या चित्राद्वारे त्यावेळी राज्यकारभारातील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारावरही कठोर प्रहार केला होता. त्यामुळे त्यावर बंदीही घालण्यात आली होती. जहाज बुडत असताना प्रयत्न करून स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची अगतिकता व आक्रोश या २४ फुटाच्या चित्रामधून अगदी मार्मिकपणे दर्शविला होता. यानंतर १०० वर्षानी अबनिंद्रनाथ टागोर यांनी ‘एन्ड ऑफ जर्नी’ रेखाटले.
युरोपियन शिक्षण व्यवस्थेचा विरोध हा या चित्राचा आशय होता. आपल्या मृत मालकाची जमापुंजी त्याच्या मुलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उंटाची अगतिकता या चित्रात दर्शविली होती. कवी किंवा लेखक विषयाचे विवेचन करू शकतो. चित्रकाराला ती सोय नसते. पण ही विषण्णता समजली की त्यातील सौंदर्य आनंद देते, अशी भावना चन्ने यांनी व्यक्त केली.

Web Title: Sadness is the beauty of ugly pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.