नृत्यासोबतच साधली अभ्यासाची साधना
By Admin | Updated: June 14, 2017 01:13 IST2017-06-14T01:13:49+5:302017-06-14T01:13:49+5:30
साधारणत: दहावीचे वर्ष आले की विद्यार्थ्यांसमोर कुटुंबीयांकडून अभ्यासासाठी दुसरा पर्यायच देण्यात येत नाही.

नृत्यासोबतच साधली अभ्यासाची साधना
‘पायल’चे प्रेरणादायी यश : राष्ट्रीय पातळीवरील नृत्यांगनेची अभ्यासातही भरारी : वडिलांनी पोटाला चिमटा काढून शिकविले
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: दहावीचे वर्ष आले की विद्यार्थ्यांसमोर कुटुंबीयांकडून अभ्यासासाठी दुसरा पर्यायच देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांचे छंद, त्यांची आवड यांना बाजूला सारण्यात येते. मात्र घरची परिस्थिती बेताचीच असून तिच्या वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन तिचा छंद जपला. तिनेदेखील घरच्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली. शास्त्रीय नृत्यात राष्ट्रीय पातळीवर स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करत असताना तिने अभ्यासाचा तोल ढळू दिला नाही. अगदी परीक्षेच्या महिन्याभर अगोदर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली. महिनाभर शाळा बुडली. मात्र सर्व आव्हानांचा सामना करत तिने अभ्यासासोबतच नृत्याचा ताल सांभाळला अन् दहावीत प्राविण्यश्रेणी प्राप्त केली. नावातच रुणुझुणू नाद असलेल्या पायल प्रसाद सप्रे हिने आदर्श प्रस्थापित केला आहे.
सेंट पॉल शाळेची विद्यार्थिनी असलेली पायल ही शास्त्रीय नृत्यांगना असून देशभरात अनेक स्पर्धांमध्ये तिने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. गाण्याचीदेखील तिला आवड असून त्याच्यादेखील तिने परीक्षा दिल्या आहेत. दहावीचे वर्ष मात्र तिचे दुहेरी परीक्षा घेणारे ठरले. एकीकडे तिला राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करायचे होते, तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत यश मिळवून घरच्यांचे स्वप्न साकारायचे होते. परीक्षेच्या महिन्याभर अगोदर पंजाबमध्ये राष्ट्रीय ‘यूथ फेस्टिव्हल’साठी ती गेली होती. याच्या सरावासाठी ती एक महिना शाळेतदेखील जाऊ शकली नाही. मात्र तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. स्वअभ्यासातून तिने यश खेचून आणले. तिला दहावीला ७८ टक्के गुण प्राप्त झाले.
परिस्थितीमुळे शिकवणी लावता आली नाही
पायलच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. तिचे वडील हे ‘पेंटर’ असून ‘आॅर्डर’ नसेल तेव्हा ते इतर कामेदेखील करतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी एकही नवा कपडा घेतलेला नाही. मात्र पंंजाबमधील स्पर्धेसाठी पोटाला चिमटा घेऊन महागडा ड्रेस घेतला. माझे वडील प्रसाद व आई भारती हे माझे आदर्श आहेत. नृत्य आणि अभ्यासात मी पुढे जावे, असे त्यांचे स्वप्न आहे. परिस्थितीअभावी मला शिकवणी लावणे शक्य नव्हते. मात्र स्वअभ्यासावर मी भर दिला. वेळ मिळेल तेव्हा मी अभ्यास करत होते. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. मात्र तरीदेखील स्वत:ला सिद्ध करून दाखविल्याचे समाधान आहे, असे पायलने सांगितले.