एस. पी. पब्लिक स्कूलच्या अध्यक्षांसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST2021-06-25T04:08:12+5:302021-06-25T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शाळेच्या बाजूला ले-आऊट टाकून त्यातील प्लॉट विकण्याच्या नावाखाली पब्लिक स्कूलच्या संचालकासह दोघांनी कोट्यवधी रुपये ...

एस. पी. पब्लिक स्कूलच्या अध्यक्षांसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शाळेच्या बाजूला ले-आऊट टाकून त्यातील प्लॉट विकण्याच्या नावाखाली पब्लिक स्कूलच्या संचालकासह दोघांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. चार वर्षे होऊनही त्यांना भूखंडाची कायदेशीर विक्री आणि ताबा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
संजय श्रीराम पेंढारकर (वय ५२, रा. हिवरी ले-आऊट) आणि कमलेश हरिचंद नागपाल (वय ५०, रा. वर्धमाननगर), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी पेंढारकर एस. पी. पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आहेत. पेंढारकर यांच्या मालकीची माैजा गोन्ही बहादुरा हिवरी ले-आऊट येथे जमीन आहे. तेथे त्यांनी २००९-१० वर्षी काही जमिनीवर शाळा बांधली तर, उर्वरित जमिनीवर त्यांनी ले-आऊट टाकले. तेथे त्यांनी १४ फेब्रुवारी २०१७ पासून प्लॉट विकले. गजानन ज्ञानेश्वर निशाणकर (वय ६४, रा. उदयनगर) आणि अन्य १७ जणांनी २ कोटी २१ लाख ५० हजार रुपये देऊन विक्रीचा करारनामा तसेच पॉवर ऑफ अटर्नी आणि कब्जापत्र दिले. त्यानंतर आरोपी पेंढारकर यांनी २३ फेब्रुवारी २०१६ ला या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी आरोपी कमलेश नागपालला दिली. नागपालने येथील प्लॉट विकण्यात आल्याची माहिती असूनही ती जमीन दादूमल नागपाल आणि रिमा नागपाल यांच्या नावे करून दिली. ही माहिती उघड होताच लाखोंची रोकड देऊन प्लॉट विकत घेणाऱ्या खरेदीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
---
दलालांकडून दिशाभूल
या प्रकरणात पोलिसांकडून बरेच दिवस प्रकरणाची चौकशी करण्यात आली. दरम्यान, सक्रिय झालेल्या दलालांनी आरोपींच्या बचावासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली. मात्र, अखेर वास्तव उजेडात आले आणि वाठोडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----