ग्रामीण लेखकांना प्रकाशनाबाबत मार्गदर्शनाची गरज
By Admin | Updated: January 7, 2015 01:01 IST2015-01-07T01:01:53+5:302015-01-07T01:01:53+5:30
ग्रामीण भागात अनेक लोक मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचे अनुभव आणि त्यातून आलेले साहित्य एकूणच ग्रामीण जीवनाचे प्रश्न, वेदना, अस्वस्थता आणि सत्य मांडणारे आहे.

ग्रामीण लेखकांना प्रकाशनाबाबत मार्गदर्शनाची गरज
प्रभू राजगडकर : लेखन-प्रकाशन व्यवहार कार्यशाळा
नागपूर : ग्रामीण भागात अनेक लोक मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचे अनुभव आणि त्यातून आलेले साहित्य एकूणच ग्रामीण जीवनाचे प्रश्न, वेदना, अस्वस्थता आणि सत्य मांडणारे आहे. पण ग्रामीण लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी साधने नाही, माहिती नाही आणि माध्यमेही त्यांच्यापर्यंत हव्या त्याप्रमाणात पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांचे साहित्य कसदार आणि वेगळे अनुभव मांडणारे असताना ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी खेड्यापाड्यात लिहिणाऱ्या लोकांना त्यांचे साहित्य प्रकाशित कसे करावे, याचे मार्गदर्शन देण्याची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ कवी प्रभू राजगडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन-प्रकाशन व्यवहार कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे, मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर, संयोजक डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. ग्रामीण भागात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक लेखनातून आपली ऊर्मी व्यक्त करीत आहेत.
साप्ताहिक आणि रविवारच्या पुरवण्यांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही. इंटरनेटही त्यांच्या आवाक्यात नाही. यात साहित्य कसे प्रकाशित करावे, याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले तर मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू होईल, असे राजगडकर म्हणाले.
यावेळी डॉ. मुनघाटे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका आणि महत्त्व विशद केले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी प्रकाशकांचे त्यांना आलेले अनुभव मिश्किल शैलीत सांगितले.
उद्घाटनानंतर ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांनी पहिल्या सत्रात सहभागी लेखकांना लेखनाची मुद्रणप्रत, प्रकाशकाशी व्यवहार, स्वयंप्रकाशन, त्याचे अर्थकारण, प्रकाशकाशी करार, आयएसबीएन क्रमांक, पुस्तकाचे वितरण, प्रसिद्धी, जाहिरात आदी विषयांवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी सहभागी लेखकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. प्रा. महेश जोगी आणि संजीवनी ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)