दहेगाव येथील ग्रामविकास अधिकारी निलंबित
By Admin | Updated: August 20, 2016 02:31 IST2016-08-20T02:31:12+5:302016-08-20T02:31:12+5:30
सावनेर पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवय मुख्यालय सोडण्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी

दहेगाव येथील ग्रामविकास अधिकारी निलंबित
परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे भोवले : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी केली कारवाई
खापरखेडा : सावनेर पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवय मुख्यालय सोडण्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथील ग्रामविकास अधिकारी आर. एस. औतकर यांच्यावरिुद्ध निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आर. एस. औतकर यांची दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारीपदी नियुक्ती केली होती. सावनेरचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी औतकर यांना त्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिले होते. मध्यंतरी हिमाने यांनी दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, औतकर अनुपस्थित होते. परिणामी, हिमाने यांनी औतकर यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान औतकर दोषी असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी औतकर यांना निलंबित केले. त्यांच्याकडून दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, पोटा ग्रामपंचायतचे सचिव विजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.
दहेगाव (रंगारी) येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ६०० रोपट्यांची लागवड करण्यात आली असून, यात १ लाख ५२ हजार ४८६ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली.
या प्रकरणात खंडविकास अधिकारी माणिक हिमाने दोषी असल्याने प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तव हिमाने यांना निलंबित करण्याची मागणी किशोर चौधरी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)