रुपालीची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: October 11, 2014 02:51 IST2014-10-11T02:51:33+5:302014-10-11T02:51:33+5:30
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत खोडगाव येथील रुपाली तुरखडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

रुपालीची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात
अमरावती : अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत खोडगाव येथील रुपाली तुरखडे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी केलेल्या चौकशीत रुपालीच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांनी येथे पत्रपरिषदेत दिलीे.
'लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली. खोडगाव येथील रहिवासी रुपाली सतीश तुरखडे हिचा मृतदेह २ आॅक्टोबर रोजी विहिरीत आढळून आला.
रुपालीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे काका राजेंद्र लंगोटे यांनी केला व रुपालीच्या सासरच्या मंडळींविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुपालीचा हुंड्याकरिता मानसिक व शारीरिक छळ करुन तिची हत्या करण्यात आली व नंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत लंगोटे यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार रुपालीच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्या अनुषंगाने आशा मिरगे यांनी चौकशी केली असता रुपालीची हत्या करुन तिचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)