धावत्या ट्रकने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:56+5:302021-04-30T04:11:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा/भारसिंगी : साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकची समाेरील चाके अचानक निखळल्याने ठिणगी पडली आणि ट्रकने पेट ...

धावत्या ट्रकने घेतला पेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा/भारसिंगी : साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकची समाेरील चाके अचानक निखळल्याने ठिणगी पडली आणि ट्रकने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान बाळगून उडी घेतल्याने प्राणहानी झाली नाही. मात्र, यात ट्रक व त्यातील संपूर्ण साहित्य जळाले. ही जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालखेडा-काटाेल मार्गावरील भारसिंगी-इंदरवाडा दरम्यान गुरुवारी (दि. २९) दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास घडली.
सीजी-०३/बीडब्ल्यू-७५४६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये अगरबत्ती तयार करण्याचा कच्चा माल, इलेक्ट्रिक माेटरपंप व इतर साहित्य घेऊन ट्रकचालक गुजरातहून अमरावती-नागपूर मार्गे ओडिशाला जायला निघाला. हा ट्रक भारसिंगी-इंदरवाडा दरम्यान येताच त्याची समाेरील चाके निखळली आणि ट्रकने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ट्रकचालकाने केबिनमधून उडी घेत पळ काढला. या मार्गाने जाणाऱ्यांपैकी काहींनी घटनेची माहिती जलालखेडा पाेलिसांना दिली.
ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. शिवाय, काटाेल व माेवाड (ता. माेवाड) येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दाेन वाहनांनी ही आग काही वेळात नियंत्रणात आणली. ताेपर्यंत ट्रकमधील संपूर्ण साहित्य जळाले हाेते. यात नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे कळू शकले नाही. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
ठिणगीमुळे लागली आग
वेगात असलेल्या या ट्रकची दाेन्ही चाके निखळल्याने ट्रकच्या लाेखंडी भागाचा राेडला जाेरात घर्षण झाले आणि ठिगणी पडली. या ठिणगीमुळे ट्रकच्या डिझेल टँकने आधी पेट घेतला. ट्रकमधील अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाने लगेच पेट घेतला. त्यामुळे क्षणार्धात या आगीने उग्र रूप धारण केले. हा ट्रक राेडच्या मध्यभागी असल्याने जलालखेडा-काटाेल मार्गावरील दाेन्ही बाजूंनी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली हाेती.