विना वाहकाची धावतेय एसटी बस
By Admin | Updated: May 4, 2015 02:21 IST2015-05-04T02:21:43+5:302015-05-04T02:21:43+5:30
प्रवासी सुविधांसोबत डिझेल आणि प्रवासात लागणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने विना वाहक बस चालविण्यास सुरुवात केली आहे.

विना वाहकाची धावतेय एसटी बस
नागपूर : प्रवासी सुविधांसोबत डिझेल आणि प्रवासात लागणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने विना वाहक बस चालविण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात काटोल मार्गावरून करण्यात आली आहे. मार्गावर ये-जा करणाऱ्या ४८ फेऱ्यात वाहकाविना बसेस धावत आहेत.
विना वाहक बस धावण्याची सुरुवात एक आठवडाभरापूर्वी करण्यात आली आहे. त्यानुसार काटोलसाठी सुटणाऱ्या गाडीत गणेशपेठ आगारातून एलआयसी चौकापर्यत वाहक उपलब्ध राहील. सर्व प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर वाहक आगारात परत येतो. काटोलवरून येणाऱ्या गाडीत काही अंतरापर्यंत वाहक उपलब्ध असतो. त्यानंतर तो दुसऱ्या बसमध्ये चढून काटोलला परत जातो. नागपूरवरून काटोलचे अंतर ५९.७ किलोमीटर आहे. मार्गावर थोड्या अंतराने बसेस उपलब्ध असल्यामुळे एसटी महामंडळाने हा प्रयोग केला आहे. आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी सांगितले की, काटोलसाठी दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत ये-जा करण्यासाठी एकूण ४८ बसेस आहेत.
पूर्वी नागपूर ते काटोल अंतर कापण्यासाठी १.४० तास लागत होते. वाहक नसल्यामुळे हे अंतर १.१५ तासात पूर्ण होत आहे. या निर्णयामुळे डिझेलची बचत होत आहे.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार आगामी काही दिवसात रामटेक आणि अमरावतीसाठी विना वाहक बस चालविण्याची तयारी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात एसटी थांबविण्यासाठी हात दाखविणाऱ्या प्रवाशांचे काय होणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)