तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले.
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले. पार्किंगमध्ये वाहन पार्क करताच पळापळा आता मुंढे आले, असे म्हणत कर्मचारी कार्यालयात घाईघाईत पोहचत होते. मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले.मुंढे यांनी बुधवारी पदभार न स्वीकारल्याने ते गुरुवारी निश्चित येतील म्हणून सकाळी १० पूर्वीच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कॅमेऱ्यासह महापालिका मुख्यालयात पोहचले. परंतु ११ वाजेपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतही मुंढे न आल्याने ते परतले. आयुक्त कक्षाकडे मुंढे आले का? कधी येणार, अशी फोनवरून दिवसभर विचारणा के ली जात होती. अपर आयुक्त यांच्याकडेही विचारणा करण्यात आली. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंढे कधी येणार, याबाबत कसलीही पूर्वसूचना मिळालेली नव्हती. नगरसेवक व पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे मुंढे यांच्याविषयी सारखी विचारणा करीत होते. परंतु कुणाकडेच यासंदर्भात माहिती नसल्याने महापालिकेच्या सर्व विभागात दिवसभर मुंढे यांचीच चर्चा होती. नागपूर जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले होते. कार्यालयात येण्याची वेळ संपली की गेट बंद करून हजेरी मस्टर आपल्या ताब्यात घेण्याचा प्रकार कर्मचाऱ्यांनी अनुभवला आहे. याची जाणीव महापालिका कर्मचाऱ्यांनाही आहे. त्यामुळे कर्मचारी ड्युटीच्या वेळेपूर्वीच कार्यालयात पोहचले होते. मुख्यालयासोबतच झोन कार्यालयातही कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. टेबलवरील फाईल नीटनेटक्या लावण्याचे काम सुरू होते. विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच विभागातील प्रलंबित फाईल्सचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना दिल्या.मुंढे रुजू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतल्याचे दिसून आले. महापालिकेचा आर्थिक स्रोत असलेल्या विभागांनी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास जाब विचारला जाईल, याची चिंता लागली आहे. सेवानिवृत्तीनंतर मानधनावर नियुक्त कर्मचारी व अधिकारी आपसात आता आपले कसे होईल, अशी दबक्या आवाजात चर्चा करताना दिसले. शहरातील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी असलेल्या प्रवर्तन विभागातही लगबग दिसून आली. शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असते. यासाठी जबाबदार धरण्याची धास्ती प्रवर्तन विभागातील तसेच झोनस्तरावरील अधिकाऱ्यांनी घेतली आहे....अन् नगरसेवकांचा फोन कट केला!महापालिकेतील काही नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. परंतु त्यांनी फोन उचलल्यानंतर आपला परिचय देऊन शुभेच्छा दिल्या. पुढे बोलणार तोच मुंढे यांनी फोन कट केल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.सर्वसामान्यांत मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागतनियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही, असे त्यांचे धोरण असल्याने मुंढे यांच्या नियुक्तीचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे.