‘आरटीई’ घेतेय गरिबांची परीक्षा!

By Admin | Updated: March 6, 2017 01:44 IST2017-03-06T01:44:24+5:302017-03-06T01:44:24+5:30

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क २००९ (आरटीई) कायद्यांतर्गत आरक्षित असलेल्या ....

'RTE' exams the poor! | ‘आरटीई’ घेतेय गरिबांची परीक्षा!

‘आरटीई’ घेतेय गरिबांची परीक्षा!

सोडत कधी जाहीर होणार ? पालक त्रस्त ७,०९९ जागांसाठी २३,७६५ अर्ज
नागपूर : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क २००९ (आरटीई) कायद्यांतर्गत आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांसाठी २०१७-१८ या सत्रासाठी २३,७६५ पालकांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरकरांनी आरटीईला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

परंतु आरटीई प्रवेशाची सोडत कधी जाहीर केली जाणार आहे, यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कुठल्याही सूचना नसल्याने, पालक त्रस्त आहेत.शिक्षण विभाग सुद्धा सोडतीच्या प्रक्रियेपासून अनभिज्ञ असून, आरटीईचा दरवर्षी होणारा खोळंबा यावर्षीही कायम राहिल का? अशी भिती पालकांमध्ये आहे.
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजारावर अर्ज अधिक दाखल झाले आहेत. आरटीईच्या प्रवेशाची दुसरी बाजू लक्षात घेता, २०१२ पासून सुरू २०१६-१७ या सत्रापर्यंत आरक्षित असलेल्या १५,७२१ जागा रिक्त आहेत.
२०१७-१८ या सत्रासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. शहरात आरटीईअंतर्गत ६२१ शाळांमध्ये ७,०९९ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा जाहीर झालेल्या आरटीईच्या प्रक्रि येत अर्ज भरण्याची अंतिम तिथी २१ फेब्रुवारी दिली होती. मात्र जास्तीत जास्त विद्यार्थी आरटीईच्या प्रक्रियेत सहभागी व्हावेत यासाठी २ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल २३,७६५ अर्ज शिक्षण विभागाकडे आॅनलाईन दाखल झाले. जागा कमी व अर्ज जास्त असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ राहणार आहे.
पहिल्यांदा जाहीर झालेल्या आरटीईच्या प्रक्रियेत २७ फेब्रुवारीला सोडत जाहीर होणार होती. परंतु मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे सोडतीचे नियोजन अद्यापही करण्यात झालेले नाही. शिक्षण विभागाकडे त्यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडेही कुठलीच निश्चित तारीख उपलब्ध नाही. त्यामुळे पालक आता सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)

खरे लाभार्थी वंचितच
आरटीईच्या अर्जांचा आकडा फुगला दिसत असला तरी, या प्रक्रियेपासून खरे लाभार्थी वंचितच आहेत. ज्या पालकांनी अर्ज भरले त्यातील बहुतांश पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे. अनेकांनी दोनवेळा अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे आरटीईच्या प्रक्रियेत अंगणवाडी आणि झोपडपट्टी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना सरसकट समाविष्ट करून घेतल्यास आरटीईचा लाभ खऱ्या विद्यार्थ्यांना होईल.

पालकांनी नामांकित शाळेचे आकर्षण टाळावे
आरटीईसाठी पालकांचा वाढलेला प्रतिसाद अतिशय अभिनंदनीय आहे. परंतु बहुतांश पालकांना नामांकित शाळेचे आकर्षण आहे. या आकर्षणामुळेच गेल्या वर्षी १८०० जागा रिक्त राहिल्या होत्या. विशेष म्हणजे २०१२ पासून आरटीईची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १५ हजार ७२१ जागा रिक्त असल्याची माहिती आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहिद शरीफ यांनी दिली आहे.

Web Title: 'RTE' exams the poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.