‘आरटीई’ ची ढकलगाडी
By Admin | Updated: April 30, 2015 02:17 IST2015-04-30T02:17:50+5:302015-04-30T02:17:50+5:30
‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत.

‘आरटीई’ ची ढकलगाडी
नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत. परंतु राज्य शासनातर्फे अद्यापही यावर ठोस निर्णयाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील यावर मौन बाळगले असून आता नेमके करावे तरी काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आरटीई’अंतर्गत पहिल्या वर्गापासूनच प्रवेश देणे शाळांना बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.
‘आॅनलाईन’ सोडत झाल्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशामधील खरा गुंता सुरू झाला. शहरातील अनेक शाळांनी ‘एन्ट्री लेव्हल’ नर्सरी असल्याचे कारण देत पहिलीचे प्रवेश नाकारले तर दुसरीकडे ‘मेस्टा’ अंतर्गत (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) येणाऱ्या ८० ते ९० शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत ‘नर्सरी’त प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पालकांना वणवण हिंडावे लागत आहे. कुणी मुख्याध्यापकांकडे आर्जव करत आहे तर कुणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या असून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णयदेखील झाला आहे. परंतु अद्याप याबाबतचे शासननिर्देश जारी झालेले नाहीत. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास शासनाकडून विलंब का लावण्यात येत आहे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)